संयुक्त संवादात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “जग सध्या अनिश्चिततेच्या काळातून जात आहे. अशा वेळी भारत-फ्रान्स भागीदारी जागतिक स्थैर्याची ताकद ठरते.”
नव्या क्षेत्रांत सहकार्य
मोदी यांनी सांगितले की दोन्ही देश महत्त्वाच्या खनिज संपत्ती (क्रिटिकल मिनरल्स), जैवतंत्रज्ञान आणि प्रगत साहित्य (अॅडव्हान्स्ड मटेरियल्स) या क्षेत्रांत सहकार्य वाढवणार आहेत.
यासोबतच काही महत्त्वाच्या संयुक्त उपक्रमांची घोषणाही करण्यात आली:
advertisement
- इंडो-फ्रेंच सेंटर फॉर AI इन हेल्थ
- इंडो-फ्रेंच सेंटर फॉर डिजिटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी
- एरोनॉटिक्स क्षेत्रातील कौशल्यविकासासाठी नॅशनल सेंटर ऑफ अलायन्स
तसेच फ्रेंच बनावटीच्या H125 सिंगल-इंजिन लाइट युटिलिटी हेलिकॉप्टरसाठी भारतात असेंब्ली लाईन उभारण्याची घोषणा करण्यात आली. यामुळे संरक्षण आणि एव्हिएशन क्षेत्रातील ‘मेक इन इंडिया’ला बळ मिळण्याची अपेक्षा आहे.
“फ्रान्सचे तांत्रिक कौशल्य आणि भारताची व्यापक क्षमता एकत्र आणणारी ही भागीदारी आहे,” असे मोदी यांनी नमूद केले. इंटरनॅशनल सोलर अलायन्स आणि इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर यांसारख्या प्लॅटफॉर्मवर विश्वासार्ह तंत्रज्ञानाच्या विकासासाठी दोन्ही देश एकत्र काम करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मॅक्रों यांचा विश्वासाचा संदेश
राष्ट्राध्यक्ष मॅक्रों यांनी भारत-फ्रान्स संबंधांना “विश्वास, पारदर्शकता आणि महत्त्वाकांक्षा” यांवर आधारित अद्वितीय नातं असे संबोधले. आज आम्ही या भागीदारीला नवा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. या संबंधांवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे, असे ते म्हणाले. मागील आठ वर्षांत इंडो-पॅसिफिक, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांत दोन्ही देशांनी घनिष्ठ सहकार्य केल्याची त्यांनी आठवण करून दिली.
पुढचा टप्पा: India AI Impact Summit
मुंबईतील कार्यक्रमांनंतर दोन्ही नेते नवी दिल्लीला रवाना होणार असून भारत मंडपम येथे होणाऱ्या India AI Impact Summit 2026मध्ये सहभागी होणार आहेत.
मॅक्रों सोमवारी उशिरा मुंबईत दाखल झाले. त्यांचे स्वागत महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भारत-फ्रान्स संबंधांना मिळालेला हा नवा दर्जा केवळ द्विपक्षीय नव्हे, तर जागतिक पातळीवरील धोरणात्मक समीकरणांमध्येही महत्त्वाचा मानला जात आहे.
