वाहतूक वळवण्याची तयारी
प्रभादेवी पूल बंद झाल्यानंतर सायन, माटुंगा बाजूकडून येणारी आणि वरळी, लोअर परळ, महालक्ष्मीच्या दिशेने जाणारी वाहतूक दादरच्या टिळक पुलावर वळवली जाणार आहे. परिणामी दादर पश्चिमेकडे प्रचंड वाहतूक दाटी निर्माण होणार आहे.
व्यापाऱ्यांची मागणी
दादर व्यापारी संघटनेचे सुनील शहा यांनी सांगितले की, प्रभादेवी पूल बंद झाल्यानंतर टिळक पुलावरील वाहतूक वाढणार असून, पादचारी आणि वाहनचालकांसाठी अडथळा ठरणाऱ्या फेरीवाल्यांना हटवणे गरजेचे आहे. तसेच पोलिस, पालिका आणि वाहतूक विभागाचे संयुक्त पथक प्रत्येक प्रमुख चौकात तैनात करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
advertisement
Mumbai Parking: मुंबईत पार्किंगचं नो टेन्शन! राज्य सरकारचा मोठा निर्णय, नेमकं काय होणार?
आधी नवा पूल उभारा
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून मागणी केली आहे की, प्रभादेवी स्थानकाच्या पश्चिमेकडून सेंट्रल रेल्वे वर्कशॉपपर्यंत नविन पादचारी पूल पूर्ण होईपर्यंत सध्याचा पूल पाडू नये. अन्यथा दादर टिळक पूल किंवा करी रोड पूल या दोनच पर्यायांवर नागरिकांना अवलंबून राहावे लागेल, ज्यामुळे मोठी गैरसोय होणार आहे.
रुग्णालये आणि शाळांना फटका
या पुलाद्वारे केईएम, बायडू, वाडिया या महत्त्वाच्या रुग्णालयांत जाणाऱ्या रुग्ण आणि नातेवाईकांना मोठा फटका बसणार आहे. तसेच या भागातील अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याचा त्रास होणार आहे. वाहतूक निरीक्षक अधिकारी ए. व्ही. सेन यांनी सांगितले की, पुलाच्या बंदीमुळे होणाऱ्या परिणामांचा सखोल अभ्यास करूनच वाहतूक मार्गात बदल करावेत. स्थानिक पातळीवर समिती स्थापन करून योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे.
वाहतूक मार्गात मोठे बदल
पश्चिम वाहिनी वाहने सायन, माटुंग्याकडून येणारी वाहने प्रभादेवीकडे जाण्यासाठी टिळक पुलावरून वळवण्यात येतील.
पूर्व वाहिनी वाहने सेनापती बापट मार्ग, रस्कर मार्ग, बाबूराव परुळेकर मार्ग, एन.सी. केलकर मार्ग, कोतवाल चाळ मार्ग आदी रस्त्यांमार्फत टिळक पुलाकडे वळवण्यात येतील.
पर्यायी रस्त्यांवर ताण
प्रभादेवी पूल बंद झाल्यानंतर दादर व्हिआडक्ट आणि करी रोड पूल या दोन पर्यायांचा वापर करावा लागेल. मात्र या दोन्ही पुलांवर आधीच वाहतुकीचा ताण असल्याने, प्रवासाचा कालावधी किमान 30 मिनिटांनी वाढण्याची शक्यता आहे.
लोअर परळ एसटी डेपोतून दादरकडे जाणाऱ्या बसेसना आता मोठा वळसा घालून मार्गक्रमण करावे लागणार आहे, यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास होण्याची शक्यता आहे.