Mumbai Parking: मुंबईत पार्किंगचं नो टेन्शन! राज्य सरकारचा मोठा निर्णय, नेमकं काय होणार?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Parking Policy: मुंबईकरांचा वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न लवकरच निकाली निघणार आहे. सरकार विशेष पार्किंग धोरण ठरवण्याच्या तयारीत आहे.
मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्य परिवहन विभागाने शहरासाठी प्रभावी आणि आधुनिक पार्किंग धोरण तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या धोरणासाठी सविस्तर अभ्यास करण्याची जबाबदारी क्रिझिल (CRISIL) या संस्थेला देण्यात आली आहे.
परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिझिल पुढील दोन महिन्यांत आपला अभ्यास अहवाल सरकारकडे सादर करणार आहे. या अहवालाच्या आधारे मुंबईसाठी विशेष पार्किंग धोरण तयार केले जाणार आहे.
कायदेशीर अडथळ्यांना फाटा
पार्किंग संदर्भातील अनेक प्रकरणे सध्या न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यामुळे धोरण तयार करताना या प्रकरणांचा सखोल अभ्यास करून कायदेशीर अडथळे टाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नियोजित धोरण हे कायदेशीरदृष्ट्या मजबूत असेल, याची खात्री सरकार घेत आहे.
advertisement
मुंबईसाठी विशेष उपाय
मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात जागेचा प्रश्न मोठा आहे. त्यामुळे व्हर्टिकल पार्किंग, मल्टिलेव्हल पार्किंगसारखे पर्याय नव्या धोरणात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. याशिवाय, स्मार्ट पार्किंग प्रणाली, मोबाइल अॅपद्वारे जागेची माहिती, ऑनलाइन बुकिंग आणि डिजिटल पेमेंट यासारख्या सुविधाही समाविष्ट केल्या जाण्याची शक्यता आहे.
advertisement
क्रिझिलकडे तीन प्रमुख पैलूंचा अभ्यास
पार्किंग धोरण तयार करताना केवळ जागेची उपलब्धता नव्हे, तर कायदेशीर बाबी, तांत्रिक उपाय, सध्याच्या पार्किंग जागांचा वापर आणि भविष्यातील गरजांचा विचार केला जाणार आहे. यासाठी क्रिझिल संस्थेला तीन प्रमुख पैलूंचा – कायदेशीर, तांत्रिक आणि भौगोलिक – सविस्तर अभ्यास करण्याचे काम सोपवले आहे.
महत्त्वाच्या संस्थांशी समन्वय
या अभ्यासादरम्यान क्रिझिल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA), मुंबई महापालिका (BMC), म्हाडा, SRA आणि अन्य संबंधित संस्थांशी समन्वय साधणार आहे.
advertisement
पार्किंगसाठी भविष्यकालीन आराखडा
हे धोरण केवळ सध्याच्या गरजांपुरते मर्यादित न राहता, भविष्यातील वाहनवाढ, शहरीकरण आणि तंत्रज्ञानाचा वापर यांचा विचार करून तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईतील पार्किंग समस्येला दूरगामी आणि शाश्वत तोडगा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 11, 2025 12:29 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Parking: मुंबईत पार्किंगचं नो टेन्शन! राज्य सरकारचा मोठा निर्णय, नेमकं काय होणार?