मुंबई : भारतीय जनता पक्षाला अनुकूल भूमिका घेणारे बार्शी विधानसभेचे अपक्ष आमदार राजाभाऊ राऊत यांना आव्हान देणारे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी चांगलेच सुनावले आहे. मनोज जरांगे हेच खरा आर्थिक दुर्बल घटकाच्या (EWS) आरक्षणाचे मारेकरी आहे. आधी मनोज जरांगे यांनी घेतलेली भूमिका आणि आता घेतलेली भूमिका यावरून त्यांचे बदलते रंग दिसून येतात. आरक्षणाच्या नावाखाली आता ते राजकीय नौटंकी करत आहेत, अशा शब्दात प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे यांना लक्ष्य केले. तसेच राजेंद्र राऊत यांच्यामागे आम्ही ठामपणे उभे असल्याचेही जरांगेंना ठणकावून सांगितले.
advertisement
मनोज जरांगे आणि आमदार राजाभाऊ राऊत यांच्यात शुक्रवारपासून तू तू मैं मैं सुरू आहे. 'मराठा आमदार राऊत यांना पुढे करून देवेंद्र फडणवीस चाल खेळत आहेत. पण मराठा समाज त्यांची चाल यशस्वी होऊ देणार नाही', असे जरांगे म्हणाले. तर जरांगे हे महाविकास आघाडीचे काम करत आहेत. अगदी उदयनराजे यांच्या पराभवाचे सूतोवाचही त्यांनी केल्याचा आरोप राऊत यांनी केला. या आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर यांनी राजाभाऊ राऊत यांची बाजू घेऊन जरांगे यांना चांगलेच सुनावले.
आरक्षणाचा प्रश्न बाजूला ठेवून राजकीय नौटंकी
मनोज जरांगे हेच खरे EWS आरक्षणाचे मारेकरी आहेत. आधी मनोज जरांगे यांनी घेतलेली भूमिका आणि आता घेतलेली भूमिका यावरून त्यांचे बदलते रंग दिसून येतात. खरे म्हणजे त्यांना आता वैफल्य आलेले आहे. मराठ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलन उभे केले, त्यातून लोकप्रियता मिळवली आणि आता मराठा आरक्षणाचा प्रश्न बाजूला ठेवून त्यांची राजकीय नौटंकी सुरु आहे, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.
मनोज जरांगे भाजप द्वेषाने पछाडलेले
जरांगे यांची नौटंकी मराठा समाजाने ओळखलेली असून त्यांचा प्रसिसादही आता कमी झालेला आहे. त्यामुळे वैफल्यातून ते भाजपवर आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. खरे म्हणजे मनोज जरांगे हे महाविकास आघाडीला पूरक काम करत आहेत. भाजप आणि महायुती द्वेषाने ते पछाडलेले आहेत. हे समाजाला कळले आहे. आमच्या राजेंद्र राऊतला ते चॅलेंज करतायेत पण आम्ही मराठा समाजाचे आमदार त्यांच्यामागे ठामपणे उभे आहोत. इतर पक्षांचे मराठा समाज देखील राजेंद्र राऊत यांच्या मागे उभे आहोत, असे दरेकर म्हणाले.
मराठा समाज काय जरांगेंची जहागीर आहे का?
मराठा समाज काय जरांगेंची जहागीर आहे का? मराठा समाजाचा सातबारा काय तुमच्या नावावर आहे काय? याला शिव्या दे... त्याला शिव्या दे... याला पाड, त्याला पाड.... तुमच्या मागे सहा कोटी लोक कोण आहेत, हेच आम्हाला आता बघायचे आहे. राजेंद्र राऊत हे ताकदीने मराठा समाजाचे काम करतात, करत राहतील... मनोज जरांगे यांनी नौटंकी थांबवावी नाहीतर त्यांच्याविरोधात मराठा समाज उभा करायला आम्हाला वेळ लागणार नाही, असा इशाराही दरेकर यांनी दिला.
