हा पाऊस मुंबईकरांसह हवामानशास्त्र विभागासाठी देखील सरप्राईज देणारा ठरला आहे. कारण मुंबईत पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याकडून देखील देण्यात आला नव्हता. आज पहाटे पासून दक्षिण मुंबईतील वरळी, दादर, सायन, चेंबूर ते वाशीपर्यंत अनेक ठिकाणी पावसाने धुव्वादार बॅटींग केली आहे. भल्या पहाटे पाऊस पडल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली.
advertisement
मुंबईत पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरला आहे. पुढील आठवडाभर मुंबईसह अनेक ठिकाणी थंडी वाढणार आहे.
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी एक्स अकाऊंटवर दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पहाटे पाच वाजल्यापासून पावसाचे ढग जमा व्हायला सुरुवात झाली होती. मुंबईसह पालघर आणि नाशिकच्या काही भागात पावसाचे ढग दाटले आहेत. या तिन्ही जिल्ह्यात पुढील काही तासांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो.
कोकणात देखील काही ठिकाणी पाऊस पडल्याची माहिती आहे. या अवकाळी पाऊसाचा फटका आंबा आणि काजूच्या शेतीला बसू शकतो. सध्या आंब्याला मोहोर फुटला आहे. पावसामुळे आंब्याचं मोठं नुकसान होऊ शकतं.
