पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील आयुष (नाव बदलले) मुंबईत असताना एका जॉब एजन्सीतल्या तरुणीच्या संपर्कात आला. त्या तरुणीने आयुषला कंबोडिया देशात एक लाख रुपये पगार असलेल्या ‘डेटा एन्ट्री ऑपरेटर’ची नोकरी देण्याचे आमिष दाखवले. तरूणीने दाखवलेल्या आमिषामध्ये तरूण शेवटी फसलाच. चांगल्या पगाराची परदेशामध्ये नोकरी मिळणार, या उद्देशाने आयुषने स्वतः सर्व पैशांची जमवा जमव करून कंबोडियाचा प्रवास केला.
advertisement
कंबोडिया विमानतळावर पोहोचताच तीन ते चार चिनी नागरिक त्याला घेण्यासाठी आले. मात्र त्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली. त्या कंपनीतल्या लोकांनी तरूणाला कंपनीमध्ये डेटा एन्ट्रीचा जॉब देण्याऐवजी जबरदस्तीने ‘कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह’चा जॉब दिला. हे काम ग्राहकांची मदत करण्याचं नसून, भारतीय नागरिकांना शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली फसवून लाखो रुपयांची आर्थिक लूट करण्याचं काम आहे. आपण ज्या कामासाठी इथं आलोय, ते न मिळाल्यामुळे तरूणाची परदेशात घुसमट होऊ लागली होती.
घडलेला प्रकार आयुषच्या लक्षात येताच त्याने कंपनीसोबत काम करण्यास नकार दिला. कंपनीसोबत काम करण्यासाठी नकार दिल्यामुळे त्या कंपनीतल्या लोकांनी आयुषला अमानुष मारहाण केली. लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्याचा शारीरिक आणि मानसिक छळही करण्यात आला. कंपनीच्या परिसरातून बाहेर पडण्यास त्याला सक्त मनाई करण्यात आली होती, तसेच स्थानिक पोलीस किंवा प्रशासनाशी संपर्क साधण्याची कोणतीही संधी त्याला दिली जात नव्हती. तब्बल चार महिने आयुष सायबर स्लेव्हच्या जाळ्यात अडकला होता.
त्या कंपनीतच्या मॅनेजमेंटने आयुषला चार महिने काम करत असताना तिथल्या पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाला संपर्क साधण्याची देखील मुभा नव्हती, त्यामुळे तो ठिकाणी चार महिने अडकूनच राहिला होता. मात्र सुदैवाने त्या कंपनीतून आयुषने आपली सुटका करून भारत देश गाठला. भारतात परतल्यानंतर आयुषने त्याच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगिततला. घडलेल्या प्रकरणी पोलिसांनी कंपनीविरोधात गुन्हा देखील दाखल केला. शिवाय, सध्या पोलिस आयुष प्रमाणे परदेशात इतर कोणते तरूण अडकलेत का? याचा सखोल तपास पोलिसांकडून केला जात आहे.
