इतिहास विसरणाऱ्यांना चव्हाणांनी सुनावले
१६ जानेवारी १९५६ रोजी नेहरूंनी मुंबई केंद्रशासित करण्याची घोषणा केली होती, याच अन्यायाविरुद्ध बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली. याचा विसर 'उबाठा' गटाला पडला असल्याची टीका चव्हाण यांनी केली. "ज्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांवर गोळ्या चालवल्या, त्याच काँग्रेसच्या कुबड्या घेऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. स्वत:चे राजकीय दुकान चालवण्यासाठी त्यांनी मराठी माणसाच्या न्यायहक्काचा बळी दिला," असे चव्हाण म्हणाले.
advertisement
कोकण रेल्वे आणि विकास: भाजपचा दावा
कोकण रेल्वेचे श्रेय घेणाऱ्यांना उत्तर देताना चव्हाण म्हणाले की, "कोकण रेल्वे ही मधू दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांसारख्या द्रष्ट्या नेत्यांमुळे आली, काँग्रेसमुळे नाही. उलट २०१४ नंतर मोदी सरकारच्या काळात कोकण रेल्वेतील स्थानकांचा कायापालट झाला. काँग्रेसने कोकणासाठी काहीही केले नाही, तरीही ठाकरे त्यांच्याशीच हातमिळवणी करत आहेत."
मराठीसाठी भाजपने काय केले?
"निवडणूक आली की ठाकरेंना मराठी माणूस आठवतो, पण गेल्या ३० वर्षांत त्यांनी मराठी माणसासाठी नेमके काय केले?" असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला. भाजपच्या कामांची यादी देताना त्यांनी खालील मुद्दे मांडले. देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्यामुळेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मुंबईतील मराठी बांधवांना हक्काचे घर देण्याचे धाडस फडणवीस सरकारनेच दाखवले. गुढीपाडव्याची भव्य शोभायात्रा ही डोंबिवलीतील संघ-भाजप कार्यकर्त्यांचीच संकल्पना आहे.
"मी मुंबईकर" मोहिमेवरून ठाकरेंना घेरले
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची 'मी मराठी' ही ओळख पुसून 'मी मुंबईकर' ही संकल्पना लादली. हे पातक बाळासाहेबांना मान्य होते का? याचे उत्तर त्यांनी द्यावे, असे आव्हान चव्हाण यांनी दिले. "मराठी माणसाच्या नावावर केवळ भावनेचे बुडबुडे निर्माण करण्यापेक्षा भाजपने ठोस काम करून दाखवले आहे. मराठी संस्कृती, भाषा आणि अस्मितेचे रक्षण केवळ भाजपच करू शकते," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
