सांताक्रूझ ते चेंबूर लिंक रोड विस्तारीकरण प्रकल्पातील वाकोला नाला ते पानबाई शाळा उन्नत मार्गासह धारावी ते वांद्रे-वरळी सी लिंककडे जाणाऱ्या कलानगर जंक्शन उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत दाखल होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईकर या पुलाच्या प्रतीक्षेत होते. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने वाकोला, बीकेसी आणि एलबीएस मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. तसेच चेंबूर येथील अमर महल ते पश्चिम द्रुतगती महामार्ग हा प्रवास अवघ्या 35 मिनिटांत पूर्ण होणार आहे.
advertisement
देशातील सर्वाधिक वळणाचा पूल
एमएमआरडीएने सांताक्रूझ – चेंबूर लिंक रोडचा सीएसटी रोड ते पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोला पुलापर्यंत विस्तार केला आहे. अंतिम टप्प्यात पश्चिम द्रुतगती मार्गाला दहिसर दिशेला जोडण्यासाठी विद्यापीठ चौकात आयकॉनिक केबल स्टेड पूल उभारण्यात आला आहे. हा पूल ऑर्थोपेडिक स्टील डेक स्वरूपातील असून, 215 मीटर लांबीचा आहे. तर जमिनीपासून 25 मीटर उंच आहे. विशेष म्हणजे हा पूल देशातील सर्वाधिक तीव्र वळण असलेला पूल ठरणार आहे.
दरम्यान, या पुलाचे काम गेल्या महिन्यातच पूर्ण झाले होते. मात्र, उद्घाटन लांबणीवर पडले होते. आता गुरुवारी हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे पूर्व-पश्चिम द्रुतगती महामार्गादरम्यान सिग्नलविरहित आणि अखंड वाहतुकीस मदत होणार आहे. तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.
