मुंबई : ठाकरेंच्या शिवसेनेत महापालिकेतील विविध समित्यांच्या निवडीवरून सुरू असलेली अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. विशेष म्हणजे, ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांना स्थायी समितीमधून डच्चू देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या विरोधी पक्षनेत्याला स्थायी तसेच इतर कोणत्याही महत्त्वाच्या समितीत स्थान न मिळाल्याची घटना घडली आहे.
advertisement
किशोरी पेडणेकर यांना केवळ विरोधी पक्षनेते आणि गटनेतेपदापुरतेच मर्यादित ठेवण्यात आले असून, कोणत्याही समितीत त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. अलिखित परंपरेनुसार महापालिकेतील विरोधी पक्षनेता हा नेहमी स्थायी समितीचा सदस्य असतो. मात्र, ही परंपरा यंदा ठाकरेंच्या शिवसेनेत मोडीत काढण्यात आली आहे. किशोरी पेडणेकर यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर पक्षातील अंतर्गत नाराजी वाढल्याचे संकेत मिळाल्याने, ही परंपरा खंडित करून समित्यांची पुनर्रचना करण्यात आल्याची चर्चा आहे.
नव्या वादाला तोंड फुटले
ठाकरेंच्या शिवसेनेने स्थायी समितीत माजी महापौर श्रद्धा जाधव आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांना संधी दिली आहे. तर स्थायी समितीनंतर महत्त्वाची मानली जाणारी सुधार समिती माजी महापौर विशाखा राऊत आणि माजी महापौर मिलिंद वैद्य यांच्या हाती सोपवण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना शांत करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसत असले, तरी किशोरी पेडणेकर यांना पूर्णतः बाजूला ठेवण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर
या घडामोडींमुळे ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. विरोधी पक्षनेत्याला समित्यांपासून दूर ठेवणे हा पक्षातील नेतृत्वाचा निर्णय की अंतर्गत दबावातून उचललेले पाऊल, यावर विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. काही पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, याचा थेट परिणाम पक्षाच्या महापालिकेतील कार्यक्षमतेवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून स्थायी समितीमध्ये कोणाला संधी?
- श्रद्धा जाधव
- रमाकांत रहाटे
- लक्ष्मी भाटिया
- दीपमाला बडे
- मीनाक्षी पाटणकर
- यशोधर फणसे
- जगदीश थैवालापिल
ठाकरे गटाचे नेतृत्व या नाराजीवर कसा तोडगा काढणार?
एकीकडे भाजपप्रणीत सत्ताधारी गट आक्रमक भूमिका घेत असताना, दुसरीकडे ठाकरे गटातील ही अंतर्गत धुसफूस अडचणी वाढवणारी ठरू शकते. त्यामुळे येत्या काळात ठाकरे गटाचे नेतृत्व या नाराजीवर कसा तोडगा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा :
