ठाकरेंच्या शिवसेनेत मानापमानाचा धुरळा! विरोधी पक्षनेतेपद मिळताच किशोरी पेडणेकरांनी मैत्रिणींचा पत्ता केला कट; नेमकं घडलं काय?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात कोण कुठे बसणार यावरूनच पक्षातल्या मैत्रीणींमध्ये आता थेट प्रतिष्ठेचा सामना पाहायला मिळाला आहे
सुमीत सावंत, प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महापालिकेच्या सत्ताकारणात पुन्हा एकदा विकास, धोरणे किंवा जनहितापेक्षा ‘कोण कुठे बसणार’ यालाच अधिक महत्त्व दिले जात असल्याचे चित्र समोर आले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत सध्या खुर्चीपेक्षा पहिल्या बाकाचीच लढाई अधिक रंगली असून सभागृहातील बसण्याच्या क्रमावरून पक्षांतर्गत मानापमानाचा धुरळा उडाला आहे. सभागृहात कोण कुठे बसणार यावरूनच पक्षातल्या मैत्रीणींमध्ये आता थेट प्रतिष्ठेचा सामना पाहायला मिळाला आहे
advertisement
विरोधी पक्षनेतेपदाची माळ किशोरी पेडणेकर यांच्या गळ्यात पडताच ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी महापौरांच्या नाराजीचा ज्वालामुखी शांतपणे धगधगू लागला आहे. विशेष म्हणजे, आज किशोरी पेडणेकर यांनी अधिकृतपणे विरोधी पक्षनेतेपद स्वीकारताना त्यांच्या पक्षातील सदस्यांमध्ये अपेक्षित उत्साह दिसला नाही. ही शांतता विरोधी पक्षातील अंतर्गत तणावाचेच द्योतक मानली जात आहे.
मुंबई पालिकेत 'फर्स्ट बेंच'वरून प्रतिष्ठेचा सामना
advertisement
महापालिका सभागृहात विरोधी पक्षांच्या गटनेत्यांसाठी डाव्या बाजूच्या पहिल्या बाकावर बसण्याची परंपरा आहे. ही जागा केवळ बसण्यापुरती नसून, ती सत्ताकारणातील प्रतिष्ठा, प्रभाव आणि नेतृत्वाचे प्रतीक मानली जाते. त्यामुळेच या पहिल्या बाकासाठी ठाकरेंच्या शिवसेनेतील चार माजी महापौरांमध्येच चुरस लागली आहे. विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर किशोरी पेडणेकर यांची या पहिल्या बाकावर वर्णी लागली असली, तरी विशाखा राऊत, श्रद्धा जाधव आणि मिलिंद वैद्य या तीन माजी महापौरांनाही याच बाकावर जागा मिळावी, अशी तीव्र इच्छा आहे.
advertisement
किशोरी पेडणेकरांचा 'तो' प्रस्ताव चर्चेत
मात्र, या सर्व समीकरणांना धक्का देत किशोरी पेडणेकर यांनी गटनेता बैठकीत एक प्रस्ताव मांडला. सर्व विरोधी पक्षांच्या गटनेत्यांना पहिल्या बाकावर जागा मिळावी, असा प्रस्ताव पुढे करून त्यांनी अप्रत्यक्षपणे आपल्या पक्षातील माजी महापौरांचा पहिल्या बाकावरचा दावा संपुष्टात आणला. परिणामी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेत्यांना आता एमआयएम, काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि मनसे यांच्या गटनेत्यांसोबत एकाच बाकावर मांडीला मांडी लावून बसावे लागणार आहे.
advertisement
ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
ही घटना केवळ बसण्याच्या जागेपुरती मर्यादित नाही. ती ठाकरेंच्या शिवसेनेतील नेतृत्वाचा संघर्ष, अंतर्गत असंतोष आणि बदलते सत्तासमीकरण यांचे स्पष्ट प्रतिबिंब आहे. जनतेच्या प्रश्नांपेक्षा प्रतिष्ठेच्या लढाया अधिक तीव्र होत असतील, तर त्याचे दूरगामी राजकीय परिणाम होऊ शकतात, हे लक्षात घेणे पक्षाच्या नेतृत्वासाठी अपरिहार्य ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 16, 2026 6:01 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
ठाकरेंच्या शिवसेनेत मानापमानाचा धुरळा! विरोधी पक्षनेतेपद मिळताच किशोरी पेडणेकरांनी मैत्रिणींचा पत्ता केला कट; नेमकं घडलं काय?








