बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Gold Prices: विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून, काही तज्ज्ञांनी भारतात दर 1 लाख रुपयांखाली येऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला आहे.
मुंबई : 2025 मध्ये गुंतवणूकदारांना प्रचंड परतावा देणाऱ्या सोन्याची तेजी नव्या वर्षाच्या सुरुवातीलाही कायम होती. जानेवारी 2026 मध्ये एमसीएक्स (MCX) वर सोने प्रति 10 ग्रॅम 1,80,779 या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले होते. मात्र आता बाजाराचा कल बदलताना दिसत आहे. गेल्या शुक्रवारी सोन्याचा दर या विक्रमी पातळीवरून सुमारे 24,500 (13.50%) घसरून 1,56,200 पर्यंत खाली आला. सोमवार 16 फेब्रुवारी रोजीही एमसीएक्सवर सोने 0.61 टक्क्यांनी घसरत 1,54,937 प्रति 10 ग्रॅम या दराने व्यवहार करत होते.
सोन्यात झालेल्या या मोठ्या घसरणीमागे बुलियन तज्ज्ञ रशियाच्या अमेरिकन डॉलरबाबतच्या बदललेल्या भूमिकेकडे लक्ष वेधत आहेत. काही तज्ज्ञांनी तर भारतात सोन्याचा दर एक लाख रुपयांखाली येऊ शकतो, अशीही शक्यता व्यक्त केली आहे.
लाइव्ह मिंटच्या अहवालानुसार रशिया पुन्हा एकदा अमेरिकेसोबत अमेरिकन डॉलर (USD) मध्ये व्यापार करण्याच्या शक्यता तपासत आहे. ही बाब आश्चर्यकारक मानली जाते. कारण रशिया दीर्घकाळापासून ‘डी-डॉलरायझेशन’ (डॉलरविरहित व्यापार) मोहिमेचे नेतृत्व करत होता. जर रशिया पुन्हा डॉलरकडे वळला, तर ब्रिक्स (BRICS) देशांनी मांडलेल्या सोन्यावर आधारित व्यापार या संकल्पनेतून निर्माण झालेली सोन्याची मागणी कमी होऊ शकते. रशियाकडून अद्याप या रिपोर्ट फेटाळला गेला नाही. मॉस्कोकडून स्पष्ट भूमिका न आल्याने सोन्याच्या खरेदीदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो.
advertisement
डी-डॉलरायझेशनचे स्वप्न
ब्रिक्स देश म्हणजेच ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांनी गेल्या काही वर्षांत आक्रमक पद्धतीने सोन्याची खरेदी केली होती. या देशांचा उद्देश डॉलरला पर्याय निर्माण करून सोन्याला व्यापाराचे माध्यम बनवण्याचा होता. उपलब्ध आकडेवारीनुसार ब्रिक्स देश जागतिक सोन्याच्या उत्पादनातील सुमारे 50 टक्के हिस्सा नियंत्रित करतात.
2020 ते 2024 या कालावधीत जागतिक स्तरावर झालेल्या सोन्याच्या एकूण खरेदीपैकी निम्मी खरेदी या देशांच्या केंद्रीय बँकांनी केली. सेबी नोंदणीकृत बाजारतज्ज्ञ अनुज गुप्ता यांच्या मते, डोनाल्ड ट्रम्प व्हाइट हाऊसमध्ये आल्यानंतर त्यांच्या टॅरिफ धोरणांचा परिणाम संतुलित करण्यासाठी जगभरातील केंद्रीय बँकांनी सोन्याची खरेदी वाढवली. त्यामुळे मागणी-पुरवठ्यात मोठे असंतुलन निर्माण झाले आणि दर झपाट्याने वाढले.
advertisement
त्यांच्या मते ब्रिक्स देशांनी दुहेरी धोरण अवलंबले होते. अधिक उत्पादन, कमी विक्री आणि आंतरराष्ट्रीय बाजारातून अतिरिक्त खरेदी. आज ब्रिक्स अर्थव्यवस्था जागतिक व्यापारातील सुमारे 30 टक्के हिस्सा नियंत्रित करतात. अशा परिस्थितीत रशियाने पुन्हा डॉलरकडे वळल्यास डी-डॉलरायझेशनचे दीर्घकालीन उद्दिष्ट कमकुवत होऊ शकते.
सोने एक लाखांखाली येणार?
PACE 360 चे अमित गोयल यांच्या मते, सोने आपला उच्चांक गाठून झाले आहे आणि आता घसरणीचा टप्पा आणखी तीव्र होऊ शकतो. भारतात सोने आधीच सुमारे 15 टक्क्यांनी घसरले असून ही घसरण आणखी वाढू शकते. त्यांच्या अंदाजानुसार भारतात सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1 लाखांच्या खाली जाऊ शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारातही दर $3,000 प्रति औंसपर्यंत खाली येऊ शकतात.
advertisement
सर्वप्रथम ‘पेपर गोल्ड’ (डिजिटल गुंतवणूक) मध्ये मोठी विक्री होईल आणि त्यानंतर भौतिक सोन्याचे दरही कोसळतील. सध्या सोन्याच्या किमतीत दिसणारी कोणतीही अल्पकालीन तेजी ही “डेड कॅट बाउंस” ठरू शकते, म्हणजेच मोठ्या घसरणीपूर्वी दिसणारी तात्पुरती उसळी, असे गोयल यांनी सांगितले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 16, 2026 8:45 PM IST
मराठी बातम्या/मनी/
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज









