नेमके काय घडले?
बुधवारी बाजारासाठी निघालेल्या आणि गावात उत्तरकार्यासाठी जात असलेल्या पाहुण्यांना घेऊन ही बोट निघाली होती. बोट खाडीच्या मध्यावर पोहोचली असताना अचानक त्यामध्ये पाणी भरू लागले, ज्यामुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. बोटीच्या चालकाने तात्काळ परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बोटीचा वेग वाढवला आणि तिला लवकरात लवकर किनाऱ्याकडे नेण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, बोटीचे इंजिन बंद पडेपर्यंत ती किनाऱ्याजवळील चिखलात रुतली. यानंतर, तातडीने सर्व 90 प्रवाशांना सुरक्षितपणे बोटीतून बाहेर काढण्यात आले.
advertisement
बोटीचे मोठे नुकसान
प्रवाशांना बाहेर काढल्यानंतर तपासणी केली असता, बोटीला सुमारे सहा इंचाचं मोठं भोक पडल्याचं दिसून आलं,या घटनेमुळे पाणजू बेटावरील जलवाहतुकीच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ग्रामस्थांची तीव्र मागणी
पाणजू बेटावर अद्ययावत जेट्टी बांधून तयार आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तीव्र मागणी केली आहे की, प्राधान्याने एक नवीन, मोठी, आणि सुरक्षित बोट उपलब्ध करून देण्यात यावी. या नवीन बोटीमध्ये किमान तीनचाकी सामानाचा टेम्पो, दुचाकी, रिक्षा यांसारखी वाहने घेऊन जाण्याची व्यवस्था असावी, अशी त्यांची मागणी आहे. या सुविधेसाठी किती वेळ लागेल आणि किती खर्च येईल, असा प्रश्नही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
