जुना ब्रिटिशकालीन पूल पाडून उभारला जातोय नवा ब्रिज
दादरमधील जुना टिळक पूल 1925 साली ब्रिटिशांनी बांधला होता. अनेक वर्षे वापरात असल्यामुळे हा पूल जीर्ण झाला होता. 2019 मध्ये मुंबई महापालिकेने हा पूल सुरक्षित नसल्याचं जाहीर केलं. गणेशोत्सवाच्या काळात या पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने नवीन पूल उभारण्याची गरज निर्माण झाली.
advertisement
दादरचा महत्त्वाचा पूल लवकरच सुरू
यामुळे महापालिकेने जुन्या पुलाच्या समांतर नवा केबल-स्टेड पूल बांधण्याचा निर्णय घेतला. नवीन पूल जुन्या पुलाच्या बाजूला बांधला जात असल्याने सध्या वाहतुकीवर फारसा परिणाम होत नाही. नवीन पूल सुरू होईपर्यंत जुना पूल वापरात राहणार आहे. नवा टिळक पूल दोन टप्प्यांत उभारला जात आहे. पहिला टप्पा एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या टप्प्यात तीन पदरी पूल बांधण्यात येत असून तो पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी उपयोगी ठरणार आहे. पहिल्या टप्प्यानंतर जुना ब्रिटिशकालीन पूल पाडण्यात येईल आणि दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू होईल.
दुसरा टप्पाही तीन पदरी असेल. एकूण सहा पदरी नवा टिळक पूल 2028 पर्यंत पूर्ण होणार आहे. या पुलाची लांबी 600 मीटर असून रुंदी 16.7 मीटर आहे. या प्रकल्पासाठी 375 कोटी रुपयांचा खर्च येणार असून मुंबई महापालिका आणि एमआरआयडीसी संयुक्तपणे हा पूल उभारत आहेत.
