मुंबई : संकट कितीही मोठं असली, तरी प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर मेहनत घेतल्यास यश हमखास मिळतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे कल्याणची माही देशवंडीकर होय. सिस्टिक फायब्रोसिससारख्या गंभीर आजाराशी झुंज देत तिने ऑक्सिजन सपोर्टवर दहावीची परीक्षा दिली. विशेष म्हणजे या परीक्षेत माहीने 86 टक्के गुण मिळवले आहेत. तिच्या या यशाचं सर्वत्र कौतुक होत असून माहीनं याच यशाबद्दल लोकल18 सोबत बोलताना माहिती दिलीये.
advertisement
माही देशवंडीकर ही कल्याण पश्चिमेतील कॅ. र. मा. ओक हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. माहीला वयाच्या आठव्या वर्षी सिस्टिक फायब्रोसिस हा फुफ्फुसांवर घाव घालणारा गंभीर आजार झाला. त्यामुळे तिची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आणि संसर्गाचा धोका वाढला. गेल्या दोन वर्षांपासून ती घराबाहेर पडू शकत नव्हती. डॉक्टरांच्या सल्ल्याने तिने ‘होम स्कूलिंग’चा मार्ग स्वीकारला.
आईच झाली शिक्षक
माहीच्या अभ्यासाचा प्रवास नववीच्या परीक्षेनंतर सुरू झाला. तिने स्वतःसाठी वर्षभराचे अभ्यासाचे वेळापत्रक तयार केले होते आणि दररोज 8 ते 9 तास अभ्यास करायची. तिच्या शिक्षणाची जबाबदारी तिच्या आई शर्मिला देशवंडिकर यांनी घेतली. त्या म्हणाल्या, "शाळेत जाऊन शिक्षकांकडून विषय समजावून घ्यायचे आणि घरी येऊन माहीला शिकवायचे. शिक्षकही व्हिडीओ कॉलवर मदत करत होते."
परीक्षेपूर्वीच आजारी
दहावीच्या परीक्षेआधीचा महिना माहीसाठी अत्यंत कठीण ठरला. ती खूप आजारी होती आणि परीक्षेबाबत भीती होती. मात्र तिच्या जिद्दीने ती लवकर सावरली आणि परीक्षेला बसली. इतकंच नाही तर माहीला चालता येत नव्हतं, त्यामुळे तिचे वडील तिला हातावर घेऊन परीक्षा केंद्रात पोहोचवायचे. तिच्यासोबत ऑक्सिजन सिलिंडरही नेण्यात आला होता.
माहीच्या यशाचा आनंद
ओक हायस्कूलचे शिक्षक बाळकृष्ण शिंदे म्हणाले, "माही अत्यंत जिद्दी आणि गुणवंत विद्यार्थिनी आहे. तिच्या शिक्षणात आम्ही पूर्ण सहकार्य केले आणि तिच्या यशाने आम्हाला खूप आनंद झाला."