आमच्या रखडलेल्या आर्थिक मागण्या मान्य करा, अन्यथा आम्ही संपावर जावू, अशी भूमिका घेऊन एसटी कर्मचारी कृती समितीने सरकारला इशारा दिला होता. त्यावर ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांची गैरसोय नको, अशी विनंती मंत्री उदय सामंत यांनी केली. कृती समिती आणि उदय सामंत यांच्यात तासभर चर्चा झाली. परंतु बैठकीत कोणताच तोडगा निघाला नसल्याने मुख्यमंत्र्यांसोबत बुधवारी बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.
advertisement
ST Strike: लालपरीला ब्रेक; प्रवाशांना फटका, राज्यात कुठे कुठे बस सेवा बंद?
आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचीही आंदोलनात उडी
सत्ताधारी पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनीही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दर्शविला आहे. किंबहुना पडळकर आणि खोत यांच्या एसटी कर्मचारी संघटना देखील संपात होतील, असा निर्णय उभय नेत्यांनी जाहीर केला आहे. आम्ही आधी जनतेचे प्रतिनिधी आहोत आणि नंतर सत्ताधारी पक्षातले आमदार आहोत. लोक आम्हाला आमच्या भूमिकेविषयी विचारतात. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे हित आम्हाला महत्त्वाचे वाटते. जर सरकारला संप नको असे वाटत असेल तर त्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या लगोलग मान्य कराव्यात, असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी राज्य शासनाला केले.
आम्ही कर्मचाऱ्यांच्यामागे ताकदीने उभे, आज रात्रीपासून चक्काजाम करून टाका!
एसटी कर्मचारी जर त्यांच्या मागण्यांसाठी उस्फूर्तपणे संपावर जात असतील तर हे अपयश अधिकाऱ्यांचे नाही का? त्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे का दुर्लक्ष केले? सरकारने अधिकाऱ्यांना सूचना देऊन एक महिना उलटला तरी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही. आज रात्रीपासून चक्काजाम करून टाका. जोपर्यंत राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांएवढे वेतन तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत मागे हटू नका, असे आवाहन करीत आम्ही कर्मचाऱ्यांच्यामागे ताकदीने उभे आहोत, असे पडळकर यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय?
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कामगारांना वेतन आणि महागाई भत्ता, घरभाडे भत्ता मिळावा, एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट पाच हजार रुपये वेतनवाढ मिळावी या आणि अन्य आर्थिक मागण्या एसटी कामगार कृती समितीने केल्या आहेत.