ठाण्यात राहणाऱ्या एका तरूणाला एका व्यक्तीने संपर्क साधून एक लाख रूपये देऊन पुढच्या तीन आठवड्यासाठी तीन लाख रूपये मिळतील, अशी बतावणी केली होती. तरूणाला हे प्रकरण संशयास्पद वाटल्याने याप्रकरणी त्याने कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून कापूरबावडी पोलीसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. बनावट नोटा घेऊन आरोपी 3 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास साकेत-बाळकूम मार्गावर येणार असल्याने पोलीसांनी सापळा रचला. संशयित व्यक्ती लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा खऱ्या चलनात बदलण्यासाठी आला होता. तेव्हा पोलिस अधिकाऱ्यांनी संजय कुमारला रंगेहाथ पकडले. मात्र, त्याचा साथीदार घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला.
advertisement
पोलीसांनी घटनास्थळावरून तसेच त्याच्या घरातून खेळण्यातील नोटांचे 500 रूपयांचे 360 बंडल, 38 बनावट सोन्याची बिस्किटे आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी किती नागरिकांची फसवणूक केली आहे, याचा तपास पोलीस सध्या करीत आहेत. पोलिस उपायुक्त प्रशांत कदम (झोन पाच, वागळे इस्टेट) यांनी जप्तीच्या वृत्ताला दुजोरा दिला आणि सांगितले की हे संशयास्पद साहित्य नागरिकांना फसवण्यासाठी वापरले जात होते. भारतीय न्याय संहिता (BNS) कायद्याच्या कलम 318(4) अंतर्गत एफआयआर नोंदवला असून पोलिस सध्या तपास करीत आहेत.
तपासात असे ही आढळून आले की, ही टोळी लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा बंडलमध्ये पॅक करत असे आणि त्या खऱ्या दिसण्यासाठी वर आणि खाली 500 रुपयांच्या खऱ्या नोटा ठेवत असे. शिवाय, ही टोळी, नागरिकांना "Suisse 100 Gm Fine Gold 999.9" असे लिहिलेले बनावट सोन्याचे बिस्किट देऊन लोकांना फसवायचे.
