मुंबईच्या दादर येथील स्विमिंग पूलमध्ये दोन अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमाला पोक्सो कोर्टाने चांगलीच अद्दल घडवली आहे. न्यायालयाने आरोपीला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा दिली आहे. स्विमिंगपूलमध्ये पोहोत असताना आरोपीनं दोन पीडित अल्पवयीन मुलींना अश्लील स्पर्श करत त्यांचं लैंगिक शोषण केलं होतं. ही घटना पाच वर्षांपूर्वी घडली होती. या प्रकरणात आता विशेष पोक्सो न्यायालयाने आरोपी तरुणाला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
advertisement
आरोपी तरुणाने बारा आणि तेरा वर्षे वयाच्या दोन मुलींना आक्षेपार्ह स्पर्श केला होता. तसेच स्विमिंगपूलमध्ये त्यांच्याजवळ जाऊन त्यांचं लैंगिक शोषण केलं होतं. हा सगळा प्रकार एका मुलीच्या लक्षात आल्यानंतर तिने महिला प्रशिक्षकाकडे आणि स्विमिंगपूलचं व्यवस्थापन करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली होती. यानंतर अन्य एका मुलीने देखील आरोपीनं आपल्यासोबत देखील गैर वर्तन केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी तीस वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला होता. ही घटना 6 मार्च 2020 रोजी घडली होती. आता या प्रकरणात कोर्टाने निकाल दिला आहे.
नेमकं प्रकरण काय होतं?
घटनेच्या दिवशी आरोपीनं एका १३ वर्षीय मुलीच्या जवळ जाऊन तिला अश्लील स्पर्श केला होता. तिच्यासोबत चुकीचं घडत असल्याचं लक्षात येताच तिने महिला प्रशिक्षक आणि जीवरक्षकाला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी संबंधित तरुणाला बोलवून जाब विचारला. मुलीने त्याला ओळखले. त्यानंतर त्या मुलीचे पालक आले असता, बारा वर्षांच्या अन्य एका मुलीनेही त्याच तरुणाकडे बोट दाखवून आक्षेपार्ह प्रकार केल्याचे सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १३ वर्षीय मुलीच्या वडिलांनी पोलिसांत एफआयआर दाखल केला होता.
'चुकून माझ्याकडे बोट दाखवलं'- आरोपीचा युक्तीवाद
‘दादर येथील जलतरण तलावात घटनेच्या वेळी ३० जण होते. कथित पीडित मुलींनी चुकून माझ्याकडे बोट दाखवले. शिवाय एफआयआर नोंदवण्यातही विलंब केला. तसेच सीसीटीव्हीचे पुरावेही सादर करण्यात आले नाही’ अशा स्वरूपाचा युक्तिवाद आरोपीने स्वत:च्या बचावासाठी कोर्टात केला होता. मात्र दोन्ही मुली घाबरलेल्या आणि रडत होत्या. त्यामुळे एफआयआर नोंदवण्यात एक दिवसाचा विलंब झाला. शिवाय जलतरण तलावाच्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावले नसल्याने ते पुरावे नाहीत, असं स्पष्टीकरण तपास अधिकाऱ्याने न्यायालयात दिलं.
सरकारी पक्षाने दोन्ही पीडित लहान मुलींसह आठ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या. त्यानंतर सर्व पुरावे लक्षात घेत न्यायाधीश बी. आर. गारे यांनी आरोपीला दोषी ठरवले. तसेच त्याला ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.