ही इमारत सुमारे चाळीस वर्षांपूर्वी उभी करण्यात आली होती. सध्या या इमारतीत तब्बल 17 कुटुंबे वास्तव्यास होती. वसई-विरार शहर महानगरपालिकेने या इमारतीला पूर्वीच धोकादायक असल्याचे घोषित केले होते. तथापि, पर्यायी निवासाची सोय नसल्यामुळे नागरिकांनी ही इमारत खाली केली नव्हती. त्यामुळे धोका असूनही नागरिक या इमारतीतच राहत होते. अखेर रविवारी स्लॅब कोसळल्याने दुर्घटना घडली.
advertisement
संपूर्ण इमारत रिकामी केली
घटनेनंतर वसई-विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण इमारत रिकामी करून सर्व रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाने इमारतीची पाहणी करून पुढील कारवाईसाठी तयारी सुरू केली आहे.
धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा समोर
या घटनेमुळे शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. वसई-विरार परिसरातील अनेक इमारती जुनाट अवस्थेत असून, काही इमारतींना महानगरपालिकेने ‘धोकादायक’ अशी यादीत नोंदवले आहे. मात्र नागरिकांना पर्यायी निवासाची सोय उपलब्ध नसल्याने, ते जीव मुठीत घेऊन अशा इमारतींमध्ये राहण्यास मजबूर आहेत.
प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप
स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. "धोकादायक इमारतींचा प्रश्न केवळ नोटिसा लावून सुटत नाही. नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे," अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. दरम्यान,महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या इमारतीतील सर्व कुटुंबांना तात्पुरते पर्यायी निवास उपलब्ध करून दिला असून, कोसळलेल्या स्लॅबमुळे झालेल्या नुकसानीचा तपास सुरू आहे. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी टळली असली तरी भविष्यातील धोके टाळण्यासाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलण्याची गरज आहे.
हे ही वाचा :