विमानतळावर इंडिगो, अकासा एअर आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या प्रमुख कंपन्या उड्डाणांसाठी तयार आहेत. इंडिगोने पहिल्या उड्डाणासाठी आपली तयारी दर्शवली आहे. विमानतळाकडे जाण्यासाठी अटल सेतू, ठाणे उन्नत मार्ग आणि मेट्रो-8च्या मार्गाचा विकास अजून चालू आहे.परंतु, तात्पुरत्या स्वरूपात बेलापूर-उलवे मार्गिकेद्वारे विमानतळाचा प्रवेश दिला जाईल. याशिवाय नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमातून 50 वातानुकूलित बस सेवा विमानतळासाठी सुरू करणार असून वाशी, ठाणे आणि मुंबईशी थेट कनेक्शन मिळेल.
advertisement
आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेने या विमानतळाला एनएमआय हा जागतिक सांकेतिक कोड दिला आहे. आता तिकीट बुकिंग करताना कंपन्यांनी या कोडचा वापर सुरू केला आहे. कार्गो वाहतुकीसाठी विमानतळ मोठे महत्त्वाचे ठरेल. सुरुवातीला 5 लाख मेट्रिक टन कार्गो वाहतुकीचे उद्दिष्ट असून पुढील काही वर्षांत 32 लाख टन मालवाहतूक साध्य करण्याचे लक्ष्य आहे. यासाठी पूर्वेकडील कार्गो टर्मिनल पूर्ण झाला असून महाराष्ट्रातील उद्योग, निर्यातदार आणि व्यापाऱ्यांसाठी हा मोठा फायदा होणार आहे.
मुख्य मार्गावरून विमानतळ पोहोचण्याचे सोपे मार्ग
ठाणे, पालघर, रायगड, मुंबई आणि उपनगरांमधील रहिवाशांसाठी पूर्व द्रुतगती मार्ग वापरून मुलुंड, एरोली मार्गे अथवा ठाणे-कळवा-विटावा-दिघा-नेरुळ-बेलापूर-उलवे रस्त्याने विमानतळ गाठता येईल. हे अंतर अंदाजे 35 ते 40 किमी आहे तर पश्चिम द्रुतगती मार्गावरून जेव्हीएलआर, पूर्व द्रुतगती मार्ग, वाशी खाडी पूलमार्गे उलवेला पोहोचता येईल हे अंतर अंदाजे 40 ते 45 किमी आहे. वरळीहून अटल सेतू आणि उलवे-बेलापूर मार्गे विमानतळ गाठता येईल.