महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, पाणीकपातीची समस्या नागरिकांना दोन दिवस उद्भवणार आहे. मंगळवार, 20 जानेवारी रोजी सकाळी 9 ते गुरुवार, 22 जानेवारी रोजी सकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 44 तास पाण्याच्या पाईपलाईनचे काम केले जाणार आहे. या कालावधीत, जी उत्तर, के पूर्व, एस, एच पूर्व आणि एन वॉर्डमधील काही वॉर्डात पाणीपुरवठा कमी दाबाने केला जाईल तर काही वॉर्डात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद केला जाईल. के पूर्व वॉर्डमधील 2,400 मिमी व्यासाच्या अप्पर वैतरणा मुख्य पाणी पाईपलाईनच्या क्रॉस-कनेक्शनमुळे हा व्यत्यय येत आहे. एमएमआरडीएच्या मेट्रो लाईन 7A प्रकल्पाच्या बांधकामासाठी पाइपलाइन वळवावी लागली. आता बीएमसी या भागामध्ये पाईपलाईनचे काम करणार आहे.
advertisement
जी उत्तर वॉर्ड (धारावी भाग)- 20 आणि 21 जानेवारी रोजी सुधारित वेळेत सकाळ आणि संध्याकाळच्या वेळात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे.
के पूर्व वॉर्ड (अंधेरी पूर्व आणि आसपासचा परिसर)- 20 आणि 21 जानेवारी रोजी एमआयडीसी, मरोळ, चकाला, विमानतळ परिसर, सीप्झ आणि आसपासचा निवासी आणि औद्योगिक झोनसह अनेक भागात पूर्णपणे पाणीपुरवठा बंद राहील. काही भागात संध्याकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, तर काही भागात 21 जानेवारी रोजी सकाळी लवकर पाणीपुरवठा बंद राहील.
एस वॉर्ड (भांडुप पश्चिम, विक्रोळी पश्चिम, कांजूरमार्ग पश्चिम)- अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, तर मोराजी नगर, गौतम नगर, जयभीम नगर आणि बेस्ट नगर यासारख्या भागात नियोजित वेळेत पूर्णपणे बंद राहील.
एच पूर्व वॉर्ड- 20 आणि 21 जानेवारी रोजी संपूर्ण वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) आणि मोतीलाल नगर परिसरात रात्री उशिरा कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार आहे.
एन वॉर्ड (घाटकोपर आणि विक्रोळी क्षेत्र)- 20 आणि 21 जानेवारी रोजी गोदरेज कंपाऊंड, आर सिटी मॉल, कैलास कॉम्प्लेक्स आणि लगतच्या परिसरांसह अनेक निवासी आणि व्यावसायिक झोनमध्ये नियमित वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ज्या भागांमध्ये पाणीपुरवठा खंडित किंवा कमी दाबाने केला जाणार आहे, त्या भागातील रहिवाशांना आधीच जास्तीचे पाणी भरून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोबतच, पाणी जपून आणि साठवून वापरण्याचे आवाहन केले गेले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, नागरिकांना पुढील काही दिवस पिण्याचे पाणी उकळून आणि फिल्टर करून पिण्याचा सल्ला देखील बीएमसीने दिला आहे.
