ठाणे : पालघर जिल्ह्यातील मनोरजवळील चिल्हार परिसरात दगड खाणीतील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुंबई येथून पर्यटनासाठी आलेल्या ३४ वर्षीय फुझेल सय्यद या तरुणाचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फुझेल सय्यद हा आपल्या सहा ते सात मित्रांसह मुंबईहून पालघर जिल्ह्यातील चिल्हार येथील ग्रीन फिल्ड परिसरातील एका फार्महाऊसवर मुक्कामी आला होता. पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या या मित्रमंडळींनी सकाळपासून परिसरातील निसर्गरम्य ठिकाणी भेटी दिल्या. दुपारच्या सुमारास फार्महाऊसच्या जवळच असलेल्या एका दगड खाणीत साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी ते गेले.
advertisement
कशी घडली दुर्घटना?
ही दगड खाण खोल असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले होते. सुरुवातीला काही तरुण पाण्यात उतरले. मात्र पाण्याची खोली लक्षात न आल्याने फुझेल सय्यद याचा तोल गेला आणि तो पाण्यात बुडू लागला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याची खोली आणि अचानक घडलेल्या प्रसंगामुळे त्यांना यश आले नाही.
आकस्मिक मृत्यूची नोंद
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मनोर पोलिसांना आणि वसई-विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला कळवले. अग्निशमन दलाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. काही तासांच्या प्रयत्नानंतर खाणीतून फुझेल सय्यद याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून मनोर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
पोलिसांचा तपास सुरू
प्राथमिक तपासात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, दगड खाणीतील पाण्यात पोहण्यासाठी जाणे धोकादायक असल्याचे वारंवार स्पष्ट होत असतानाही अशा घटना घडत असल्याने प्रशासनाने या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, तसेच पर्यटकांनीही अशा धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
