विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वे उपनगरीय सेवा, मेल-एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये सखोल तिकीट तपासणी करते. पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली अनुभवी तिकीट तपासणी पथकाद्वारे एप्रिल ते जानेवारी 2025 या काळात अनेक तिकीट तपासणी मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. यात 2.24 लाख प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे.
लोकलध्ये 173 फुकटे प्रवासी
advertisement
वातानुकूलित लोकल आणि प्रथम श्रेणी डब्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विनातिकीट प्रवास होत आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर तिकीट तपासणीच्या मोहिमांना वेग दिला आहे. 10 महिन्यांत वातानुकूलित लोकलमधून 52 हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली आहे. या लोकलमध्ये दररोज सरासरी 173 प्रवासी विनातिकीट आढळले आहेत. त्यांच्याकडून 38 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
117 कोटींचा दंड वसूल
पश्चिम रेल्वेने विनातिकीट प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करीत 117 कोटी 54 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. यात उपनगरी रेल्वेने 38 कोटी आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेने 79 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. या मोहिमेअंतर्गत वातानुकूलित लोकलमधील 52 हजार, तर सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणी, दिव्यांग डबा आणि महिला डब्यात 98 हजार प्रवासी विनातिकीट किंवा चुकीच्या तिकिटासह सापडले होते. विनातिकीट प्रवासामुळे नियमित तिकीट घेणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे प्रवास करताना वैध तिकीट किंवा पास बाळगावा. अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिला आहे.