आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस 20 डब्यांची होणार
आता आणखी एका वंदे भारत गाडीचा रेकही 20 डब्यांचा करण्याची तयारी सुरू आहे. मात्र या वाढीव डब्यांसाठी मुंबई सेंट्रल टर्मिनसवर पुरेशी लांबी असलेला प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी वेळापत्रकात बदल
मुंबई सेंट्रलवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरून यापूर्वी 16 डब्यांची वंदे भारत गाडी चालवली जात होती. या प्लॅटफॉर्मवर सध्या विस्ताराचे काम सुरू असल्यामुळे तो गाड्यांच्या वाहतुकीसाठी तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे, त्यामुळे दुसरी वंदे भारत 20 डब्यांसह चालवणे शक्य होत नाही. या कारणामुळे काही गाड्या मुंबई सेंट्रलऐवजी वांद्रे टर्मिनसवरून चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
advertisement
या बदलाचा फटका केवळ प्रवाशांनाच नव्हे तर मुंबई सेंट्रल स्थानकावरील स्टॉलचालकांनाही बसत आहे. गाड्या वांद्रे टर्मिनसवर शिफ्ट झाल्याने मुंबई सेंट्रलवरील प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे चहाचे, खाद्यपदार्थांचे आणि इतर वस्तूंचे विक्री व्यवहार कमी झाले आहेत. एका स्टॉलचालकाने सांगितले की टेंडर भरताना स्थानकावरून धावणाऱ्या गाड्यांच्या संख्येच्या आधारावर कोटेशन दिले जाते. मात्र आता गाड्या दुसऱ्या स्थानकावरून धावत असल्याने अपेक्षित व्यवसाय मिळत नाही आणि उत्पन्नावर परिणाम होत आहे.
मुंबई सेंट्रलऐवजी आता वांद्रे टर्मिनसवरून गाडी धावणार
दरम्यान काही गाड्यांची स्थानके तात्पुरती बदलण्यात आली आहेत. कर्णावती एक्स्प्रेस आता मुंबई सेंट्रलऐवजी वांद्रे टर्मिनसवरून धावेल. तसेच गोल्डन टेम्पल मेलही वांद्रे स्थानकातून सुटणार आहे. पश्चिम एक्स्प्रेसच्या स्थानकातही तात्पुरता बदल करण्यात आला आहे. या बदलांमुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी गाडीचे स्थानक तपासण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे
