काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरर्गे यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप ठरल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये जागावाटपापासून ते मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यापर्यंत तिन्ही पक्षांमध्ये जवळपास एकमत झाले आहे. महाविकस आघाडीमधून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठीच्या जागा वाटपावर देखील महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये औपचारिक चर्चा झाली. समोर आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक जगांवर काँग्रेस निवडणूक लढवणार आहे, दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना उद्धव ठाकरे गट तर तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी शरद पवार गट असणार आहे.
advertisement
उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा
उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दिल्ली दौऱ्याचा तिसरा दिवस आहे. ते आज उपराष्ट्रपतींना भेटणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा असून, त्यांनी आपल्या या दौऱ्यामध्ये अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. तसेच बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमधून त्यांनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.