१९८९ मध्ये तत्कालीन गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबैया यांचे अपहरण करण्यात आले होते. या घटनेने देशभरात खळबळ उडाली होती. दहशतवाद्यांनी पाच दहशतवाद्यांच्या सुटकेची मागणी केली होती. ८ डिसेंबर १९८९ रोजी श्रीनगरमधील लाल देद रुग्णालयातून रुबैयाचे अपहरण करण्यात आले होते.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शफत शांगलू हा जेकेएलएफ प्रमुख यासीन मलिकचा निकटवर्तीय मानला जातो. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रुबैया सईदच्या अपहरणाशी संबंधित ३५ वर्षे जुन्या प्रकरणात तो बराच फरार होता.आता कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून त्याला अटक करण्यात आली आहे आणि त्याला जम्मूतील टाडा न्यायालयात हजर केले जाईल. १९८९ मध्ये रणबीर दंड संहिता आणि टाडा कायद्याच्या विविध कलमांखाली त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
advertisement
यासिन मलिक हा देखील त्याच्यासोबत एक प्रमुख आरोपी आहे. तो जेकेएलएफमध्ये महत्त्वाच्या स्तरावर काम करत होता आणि संघटनेचे आर्थिक व्यवहार हाताळत होता. या भूमिकेमुळे तो केवळ कटात सहभागी नव्हता तर एक प्रमुख आरोपी देखील होता. सीबीआयने जम्मू-काश्मीर पोलिसांच्या सहकार्याने संयुक्त कारवाईत शफत अहमद शांगलूला श्रीनगरच्या निशात परिसरातील त्याच्या घरातून अटक केली. सीबीआयने १९९० मध्ये हे प्रकरण आपल्याकडे खेचले होते.
रुबैया सईद अपहरण प्रकरणात जेकेएलएफ प्रमुख यासिन मलिकवर खटला सुरू आहे. मलिक हा सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात दहशतवादाला आर्थिक मदत पुरवण्याच्या प्रकरणात शिक्षा भोगत आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयीन सुनावणीत सहभागी होत आहे. आता रुबैया सईद या प्रकरणात सरकारी साक्षीदार आहे. रुबैया या सध्या तामिळनाडूमध्ये वास्तव्य करत आहेत.
रुबैयाला सीबीआयने सरकारी साक्षीदार म्हणून जाहीर केले आहे. न्यायालयीन कामकाजादरम्यान तिने यासिन मलिक आणि इतर चार आरोपींना अपहरणात सहभागी असल्याचे ओळखले. ही ओळख आता खटल्यात महत्त्वाचा पुरावा म्हणून वापरली जात आहे.
रुबैया सईदचे वडील मुफ्ती मोहम्मद सईद त्यावेळी केंद्र सरकारमध्ये गृहमंत्री होते. पाच दिवसांच्या नाट्यानंतर, केंद्रातील भाजप समर्थित व्ही.पी. सिंह सरकारने पाच दहशतवाद्यांना सोडण्याचा निर्णय घेतला होता.
खटल्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यासाठी, तपास यंत्रणेने श्रीनगरमध्ये चार सुरक्षा कर्मचाऱ्यांचे अपहरण आणि हत्या यासह अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांमध्ये यासिन मलिकविरुद्ध आरोप निश्चित केले आहेत. यासिन मलिक विरोधात तपास यंत्रणांनी आपल्या कारवाईचा फास आवळला आहे. यासिन विरोधातील प्रलंबित खटल्यांचा तपास आणि सुनावणी तातडीने पूर्ण करण्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत.
