राजीनामा दिलेल्या आमदारांमध्ये नरेश यादव (मेहरौली), रोहित कुमार (त्रिलोकपुरी), राजेश ऋषी (जनकपुरी), मदन लाल (कस्तुरबा नगर), पवन शर्मा (आदर्श नगर), भावना गौड (पालम), गिरीश सोनी (मादीपूर) आणि बीएस जून (बिजवासन) यांचा समावेश आहे. बीएस जून हे राजीनामा देणारे पहिले आमदार होते. अरविंद केजरीवाल यांनी या सर्व आमदारांची तिकीटं कापली होती. त्यामुळे पक्षांतर्गत त्यांच्याविरोधात नाराजी वाढली होती. शुक्रवारी या नाराजीचा विस्फोट झाला आणि आठ आमदारांनी पक्षाला रामराम ठोकला.
advertisement
पालमच्या भावना गौड यांनी आपल्या राजीनामा पत्रात पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर निराशा व्यक्त केली. "माझा तुमच्यावरील विश्वास उडाला आहे," असं त्यांनी म्हटलं. नरेश यादव हे यापूर्वी मेहरौलीचे उमेदवार होते. डिसेंबरमध्ये कुराण अवमान प्रकरणात पंजाब न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले होते आणि त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दिल्ली निवडणुकीसाठी आपने उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली तेव्हा पक्षाने नरेश यादव यांच्या जागी महेंद्र चौधरी यांना मेहरौलीचे उमेदवार म्हणून घोषित केले. तेव्हा पासून नरेंद्र यादव पक्षात नाराज होते.
नरेश यादव यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले की, आम आदमी पार्टीने प्रामाणिक राजकारण या आपल्या मूळ तत्वाचा त्याग केला आहे. भ्रष्टाचार कमी करण्याचे वचन पूर्ण करण्याऐवजी पक्ष "भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकला आहे" असा आरोप त्यांनी केला. दिल्लीतील दारू धोरण प्रकरणात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अनेक महिने तुरुंगवास भोगावा लागला होता, यावरून त्यांनी टीकास्त्र सोडलं.
राजीनामा देणारे त्रिलोकपुरीचे आमदार रोहित कुमार यांनी X वर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ते दलित आणि वाल्मिकी समुदायांना सामाजिक न्याय मिळवून देण्याच्या आशेने अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनादरम्यान 'आप'मध्ये सामील झाले होते. 'आप'ने या समुदायांना उन्नत करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु कंत्राटी कामगार रद्द करणे आणि तात्पुरत्या कामगारांना कायमचे सामावून घेणे, यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आम आदमी अपयशी ठरले. अशाच प्रकारे इतरही आमदारांनी आपल्या राजीनामा पत्रातून आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांच्याबाबत खदखद व्यक्त करत पक्षाला रामराम ठोकला आहे.