दिल्लीला जाणारे इंडिगोचे विमान (6E-2111) टेकऑफसाठी धावत होते. मात्र, अचानक टेकऑफ घेण्याऐवजी पायलटने अचानक आपात्कालीन ब्रेक लावत विमान थांबवले. टेकऑफसाठी विमानाला इंजिनकडून पुरेसा जोर मिळत नसल्याने पायलटने टेकऑफ ऐनवेळी रद्द केले.
या विमानात सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्या खासदार पत्नी डिंपल यादव यांच्यासह 151 प्रवासी होते. अचानक उड्डाण थांबल्याने प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली आणि अनेक जण घाबरले. तथापि, सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि नंतर दुसऱ्या विमानाने दिल्लीला पाठवण्यात आले. इंडिगोने याला तांत्रिक बिघाड असल्याचे सांगितले आहे. पायलटच्या प्रसंगावधानामुळे विमान अपघात टळला असल्याचे सांगण्यात येत आहे.
advertisement
उड्डाण धावपट्टीवर थांबवावे लागले
शनिवारी लखनऊमध्ये उड्डाण क्रमांक ६E-2111 मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने घबराट निर्माण झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लखनऊ-दिल्ली मार्गावर उड्डाण करणाऱ्या इंडिगो विमानाला उड्डाण घेण्यापूर्वी धावपट्टीवर थांबवावे लागले. धावपट्टीवर वेगाने धावल्यानंतरही विमान हवेत उड्डाण करू शकले नाही. सुदैवाने, विमानाच्या कॅप्टनने ऐनवेळी निर्णय घेत टेकऑफ रद्द केला.
इंडिगोकडून अद्याप स्पष्टीकरण नाही....
विमानतळ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीजीसीएने या घटनेचा अहवाल मागवला आहे. त्याचवेळी, इंडिगोने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की तांत्रिक कारणांमुळे विमानाला टेकऑफ थांबवावा लागला. इंडिगोने उड्डाण का थांबवण्यात आले, याचे स्पष्टीकरण दिले. विमानतळ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पायलटने ताबडतोब एटीसीला अबेंडिंग टेक ऑफ (Abandoning Take-Off) हा संदेश देत उड्डाण न घेण्याची कृती केली.
अबेंडिंग टेक ऑफ (Abandoning Take-Off) म्हणजे काय?
अबँडनिंग टेक-ऑफ किंवा रिजेक्टेड टेक-ऑफ (आरटीओ) म्हणजे जेव्हा पायलट धावपट्टीवर धावताना विमान उड्डाण घेण्यापूर्वीच थांबवतो तेव्हाच हा निर्णय घेतला जातो. जेव्हा टेकऑफ सुरू ठेवणे प्रवाशांच्या आणि विमानाच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरू शकते तेव्हाच हा निर्णय घेतला जातो. जेव्हा इंजिनला पुरेसा जोर मिळत नाही, तांत्रिक बिघाड आढळतो, धावपट्टीवर अडथळा येतो किंवा हवामानामुळे धोका वाढतो, अशा काही विशेष कारणांसाठी हा निर्णय घेतला जातो. या दरम्यान, पायलट आपत्कालीन ब्रेक लावून विमान ताबडतोब थांबवतो, जेणेकरून प्रवासी सुरक्षित राहतील.