गुवाहाटी: सरकारी नोकरी का स्वीकारली? या प्रश्नाचे उत्तर देताना अनेकजण ‘देश आणि जनतेची सेवा करण्यासाठी’ असे सांगतात. मात्र प्रत्यक्षात खूप कमी अधिकारी प्रत्यक्षात तसे वागतात. अनेक अधिकारी सत्ता आणि पैशासाठी भ्रष्टाचार करतात. असाच एक धक्कादायक प्रकार आसाममध्ये उघडकीस आला आहे. आसाम नागरी सेवा (ACS) अधिकारी नूपुर बोरा यांच्या सरकारी निवासस्थानातून मुख्यमंत्री दक्षता पथकाने (Chief Minister’s Vigilance Team) कोट्यवधी रुपयांची अवैध संपत्ती जप्त केली आहे.
advertisement
नूपुर बोरा या 2019च्या बॅचच्या अधिकारी आहेत आणि त्यांच्यावर गेल्या सहा महिन्यांपासून दक्षता पथकाची नजर होती. बारपेटा जिल्ह्यातील सर्कल ऑफिसर म्हणून काम करत असताना त्यांच्यावर बेकायदेशीर कामांमध्ये सामील असल्याचा आरोप आहे. तपासानुसार त्यांनी पैसे घेऊन संशयास्पद लोकांना अवैधपणे वसवण्याचे काम केले होते.
काय सापडले?
सोमवारी त्यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात एकूण 2 कोटींची अवैध संपत्ती जप्त करण्यात आली. यामध्ये जवळपास 90 लाख रोख रक्कम आणि 1 कोटींहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने होते. एका सामान्य सरकारी अधिकाऱ्याच्या घरात इतकी मोठी रक्कम पाहून दक्षता पथकाचे अधिकारीही थक्क झाले.
तीन ठिकाणी छापे
हे छापे रविवार रात्री टाकले जाणार होते. परंतु अधिकारी बोरा घरी नसल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली. सोमवार सकाळी त्या घरी परतल्यानंतर त्यांच्या गुवाहाटी येथील निवासस्थानी ही कारवाई सुरू झाली. त्यानंतर त्यांच्याशी संबंधित इतर तीन ठिकाणांवरही छापे टाकण्यात आले. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितले की, बोरा यांच्या हालचालींवर गेल्या सहा महिन्यांपासून बारीक नजर ठेवली जात होती.
'रेट कार्ड'चा आरोप
शिवसागरचे आमदार अखिल गोगोई यांच्या नेतृत्वाखालील ‘कृषक मुक्ती संग्राम समिती’ (KMSS) या सामाजिक संघटनेने बोरा यांच्या विरोधात अधिकृत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार बोरा यांनी विविध जमीन-संबंधित सेवांसाठी एक विशिष्ट 'रेट कार्ड' तयार केले होते. तक्रारीत नमूद केल्यानुसार लाचेची रक्कम जमिनीचा नकाशा देण्यासाठी 1,500 पासून ते जमिनीच्या नोंदींमध्ये नाव जोडण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी 2 लाखांपर्यंत होती.
पुढील तपास सुरू
या छाप्याचे नेतृत्व करणाऱ्या सीएम दक्षता पथकाच्या एसपी रोझी कलिता यांनी सांगितले की, बोरा यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप आहेत. जप्त केलेली रक्कम आणि दागिने हे फक्त प्राथमिक कारवाईचा भाग आहेत. पुढील तपासामध्ये आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.