2021 मध्ये या पाचही राज्यांच्या निवडणुकांची घोषणा 26 फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती. त्या वेळी पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांत मतदान झाले होते. 2021 मध्ये पश्चिम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ 7 मे, तमिळनाडूचा 10 मे, आसामचा 20 मे आणि केरळ विधानसभेचा कार्यकाळ 23 मे रोजी संपला होता. तर पुडुचेरी विधानसभेचा कार्यकाळ सर्वांत शेवटी म्हणजे 15 जून रोजी संपत आहे.
advertisement
| राज्य | मतदानाची तारीख | निकालाची तारीख | एकूण जागा | बहुमतासाठी आवश्यक जागा |
| पश्चिम बंगाल | 23, 29 एप्रिल | 4 मे 2026 | 294 | 148 |
| तमिळनाडू | 23 एप्रिल 2026 | 4 मे 2026 | 234 | 118 |
| केरळ | 9 एप्रिल 2026 | 4 मे 2026 | 140 | 71 |
| आसाम | 9 एप्रिल 2026 | 4 मे 2026 | 126 | 64 |
| पुडुचेरी | 9 एप्रिल 2026 | 4 मे 2026 | 30 | 16 |
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सलग चौथ्यांदा सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहेत. तर विरोधी पक्ष भाजप सत्तांतर घडवून आणण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. विशेष मतदार यादी पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेनंतर या निवडणुका होत असून हा मुद्दा मोठ्या राजकीय वादाचा विषय ठरला आणि प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले.
दक्षिणेत तमिळनाडूमध्ये एम. के. स्टालिन यांच्या नेतृत्वाखालील द्रविड मुन्नेत्र कळघम दुसऱ्या कार्यकाळासाठी प्रयत्न करत आहे. विरोधी पक्ष म्हणून अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघमआणि भाजपने युती केली आहे. यंदाच्या निवडणुकीतील आणखी एक मोठी चर्चा म्हणजे अभिनेता-राजकारणी विजय (अभिनेता) यांनी आपल्या तमिलगा वेत्री कळघम (TVK) या पक्षासह राजकारणात प्रवेश केला आहे.
केरळमध्ये डाव्या पक्ष आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होणार आहे. राज्यात प्रत्येक निवडणुकीत सत्ता बदलण्याची परंपरा असताना, पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तिसऱ्या कार्यकाळासाठी प्रयत्न करत आहे. तर काँग्रेस 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या निकालामुळे उत्साहित आहे, मात्र अंतर्गत मतभेद नियंत्रणात ठेवणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
ईशान्य भारताचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या आसाममध्ये मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा दुसऱ्या कार्यकाळासाठी प्रयत्न करत आहेत. तर काँग्रेसला मोठी कामगिरी करण्याची आशा आहे. राज्य काँग्रेसचे प्रमुख गौरव गोगोई यांच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडीला गेल्या काही महिन्यांत काही मोठे धक्के बसले असून माजी प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा यांच्यासह अनेक नेते पक्ष सोडून गेले आहेत.
पुडुचेरीमध्ये अखिल भारतीय एन.आर. काँग्रेस आणि मुख्यमंत्री एन. रंगसामी तिसऱ्या कार्यकाळासाठी प्रयत्न करत आहेत. तर विरोधी पक्ष म्हणून द्रविड मुन्नेत्र कळघम सत्तांतर घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.
