दिल्ली विधानसभेसाठी बुधवारी मतदान संपन्न झाले असून ८ फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा निकाल लागेल. दिल्ली विधानसभेसाठी जवळपास ६० टक्के मतदान झाले आहे. हरियाणा आणि महाराष्ट्र जिंकल्यानंतर दिल्ली जिंकण्यासाठी भाजप आसुसलेले आहे. महाराष्ट्रात थोड्याफार फरकाने का होईना पण आघाडी सरकार येईल, असे विविध मतदानोत्तर चाचण्यांमधून समोर येत असताना ॲक्सिस माय इंडियाने मात्र महाराष्ट्र भाजपच्या मागे ठामपणे उभा असेल असे सांगितले. जे चित्र निकालानंतर स्पष्ट झाले. त्यामुळे ॲक्सिसच्या दिल्ली निवडणुकीच्या अंदाजाकडे अनेक जण डोळे लावून बसले होते. गुरूवारी रात्री ॲक्सिसने आकडे प्रसिद्ध केले आहेत.
advertisement
ॲक्सिसचा दिल्लीसाठी खास अंदाज!
ॲक्सिसच्या अंदाजानुसार, भाजप २५ वर्षांनंतर दिल्ली जिंकू शकते. मतदानोत्तर चाचणीनुसार, भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करू शकते. भाजपला ७० पैकी ४५ ते ५५ जागा मिळू शकतात. त्याच वेळी, आपला केवळ १५ ते २५ जागा जिंकण्यात यश येईल, असे ॲक्सिसचे म्हणणे आहे. दुसरीकडे काँग्रेसला ० ते १ जागा मिळू शकते, असा अंदाज ॲक्सिसने वर्तवला आहे.
अॅक्सिस माय इंडियाच्या सर्वेक्षणानुसार, आपला ४२ 'टक्के, भाजपला ४८ टक्के आणि काँग्रेसला ७ टक्के मते मिळू शकतात. तीन टक्के मते इतरांना जाऊ शकतात. सर्वेक्षणादरम्यान १३ हजार लोकांशी संवाद साधण्यात आल्याचेही ॲक्सिसने स्पष्ट केले.
मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलनुसार, भाजप ३५ ते पैकी ३९ जागा जिंकून सरकार स्थापन करू शकते. त्याच वेळी, 'आप'ला ३२ ते ३७ जागा मिळू शकतात तर काँग्रेसला शून्य ते दोन जागा मिळण्याची अपेक्षा आहे.
पी-मार्कच्या एक्झिट पोलनुसार, भाजप ३९-४९ जागा जिंकून पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करू शकते. या सर्वेक्षणात 'आप'ला २१ ते ३१ जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसला ०-१ जागा मिळण्याची अपेक्षा आहे.