निकाल बिहारचे अन् शेअर बाजार कोसळला
देशभरात आज बिहार निवडणुकीच्या निकालाची चर्चा आहे. राज्यात पुन्हा एकदा एनडीए सरकार येणार असल्याची शक्यता दिसत आहे. सकाळी १० वाजता हाती आलेल्या कलानुसार एनडीएने १७१ जागांवर आघाडी घेतली होती. तर राजद-काँग्रेस महागठबंधनने ६८ जागांवर आघाडी घेतली होती. राज्यात पुन्हा एकदा एनडीए सरकार येण्याची शक्यता असताना शेअर बाजारात मात्र मोठा भूकंप झाला आहे. निफ्टी, सेक्सेक्स या दोन्ही बाजारात मोठी घसरण झाली आहे. बिहारमध्ये पुन्हा केंद्रातील मोदी सरकारचा पाठिंबा असलेले सरकार सत्तेत येत असताना शेअर बाजारात त्याचे सकारात्मक संकेत मिळायला हवे होते. मात्र बाजारातील चित्र वेगळे आहे. अर्थात बाजारातील या घसरणीला निवडणुकांचे नाही तर जागतिक संदर्भ आहेत. सकाळपासूनच आशियाई बाजारपेठांमध्ये मोठी घसरण दिसून आली. अमेरिकेतील प्रमुख निर्देशांक – डाऊ (Dow), नैस्डॅक (Nasdaq), आणि एसअँडपी 500 (S&P 500) हे देखील 1.7% ते 2.3% पर्यंत घसरून बंद झाले. तंत्रज्ञान (टेक) क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्रीचा आणखी एक टप्पा सुरू झाला. अमेरिकेच्या ‘फेडरल रिझर्व्ह’कडून व्याजदर कपातीबाबत (रेट कट) असलेल्या अनिश्चिततेमुळे (अनिश्चितता) गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण होते.