इतकंच नाही तर अनेक खलिस्तानी दहशतवादी आणि गँगस्टर कॅनडात आश्रय घेऊन भारताविरुद्ध आपला अजेंडा चालवत आहे. ते भारतातील तरुणांना फूस लावून त्यांना आपल्या पक्षात सामील करून घेतात. ते तरुणांना पैशाचं आणि कॅनडात रोजगार देण्याचं आमिष दाखवतात. अलीकडेच अशा 9 खलिस्तानी दहशतवादी आणि कुख्यात गुंडांची नावं समोर आली आहेत, ज्यांची नावं भारतातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीत समाविष्ट आहेत. सुखदूलसिंग उर्फ सुखा, गुरपिंदरसिंग उर्फ बाबा दल्ला, सतवीरसिंग वारिंग उर्फ सॅम, स्नोवर ढिल्लन, लखबीरसिंग उर्फ लांडा, अर्शदीपसिंग उर्फ अर्श डाला, चरणजितसिंग उर्फ रिंकू बिहला, रमनदीपसिंग उर्फ रमन जज, गगनदीपसिंग उर्फ गगना हठूर अशी या नऊ जणांनी नावं आहेत.
advertisement
हे सर्वजण कॅनडामध्ये छुप्या पद्धतीने भारतविरोधी अजेंडा चालवतात. ते सर्व राष्ट्रीय तपास संस्थेच्या म्हणजेच एनआयएच्या रडारवर आहेत. भारत सरकारनं त्यापैकी चार जणांविरुद्ध रेड कॉर्नर नोटीसही जारी केली आहे. हे गुन्हेगार कॅनडामध्ये असल्याची पुष्टी केल्यानंतर, प्रत्यर्पणाची कार्यवाही सुरू होऊ शकते. पण, हे इतकं सोपं नाही. कारण भारतीय सुरक्षा यंत्रणांनी अनेक वेळा हे दहशतवादी आणि गुन्हेगार कॅनडामध्ये लपून बसल्याचे पुरावे दिले आहेत. मात्र, या प्रकरणी कॅनडाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मागील परिस्थिती पाहता कॅनडाकडून फारसं सहकार्य अपेक्षित नाही.
18 जून रोजी झाला निज्जरचा खून
18 जून 2023 रोजी कॅनडातील सरे शहरातील एका गुरुद्वाराच्या पार्किंगमध्ये पहाटे हरदीपसिंग निज्जर याची अज्ञात शूटर्सनी गोळ्या झाडून हत्या केली. निज्जर पार्किंगमध्ये ठिकाणी पोहोचताच तिथे आधीच थांबलेल्या शूटर्सनी त्यांच्यावर गोळ्या झाडायला सुरुवात केली आणि कोणाला काही समजण्याआधीच ते तेथून पसार झाले. खलिस्तानी दहशतवादी असलेल्या निज्जरवर भारतातील डझनभर गुन्ह्यांचे आरोप आहेत.
41 दहशतवाद्यांच्या यादीत होतं निज्जरचं नाव
जिवंत किंवा मृत स्थितीत ताबा हवा असलेल्या 41 दहशतवाद्यांच्या यादीत निज्जरचा समावेश होता. भारतातील राष्ट्रीय तपास संस्थेनं निज्जरवर 10 लाखांचं बक्षीसही जाहीर केलेलं होतं. पण, भारत सरकारच्या ताब्यात येण्यापूर्वीच निज्जरच्या शत्रूंनी त्याचा खून केला .
निज्जरच्या मृत्यूबाबत ट्रुडो यांचं वक्तव्य
कॅनडात मारल्या गेलेल्या निज्जरच्या मृत्यूनंतर तीन महिन्यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. ट्रूडो यांनी सोमवारी कॅनडाच्या संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्यं सांगितलं की, "भारत सरकार आणि कॅनडाचा नागरिक हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा संबंध असल्याच्या आरोपांची कॅनडातील सुरक्षा एजन्सी सक्रियपणे चौकशी करत आहेत. यात कोणत्याही परदेशी सरकारचा सहभाग आहे. कॅनडाच्या भूमीवर ही हत्या खपवून घेतली जाणार नाही. हे आमच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे. ते पूर्णपणे अस्वीकारार्ह आहे."
पुराव्याशिवाय भारतावर आरोप
कोणताही पुरावा नसताना ट्रुडो यांनी निज्जरच्या मृत्यूसाठी थेट भारताला जबाबदार धरल्यामुळे गदारोळ माजलाच आहे. ट्रूडो यांच्या या वक्तव्यानंतर परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी या घटनेच्या निषेधार्थ एका प्रख्यात भारतीय पराराष्ट्र अधिकाऱ्याची हकालपट्टी करत असल्याचं सांगितलं. या बदल्यात भारतानंही कॅनडाच्या एका परराष्ट्र अधिकाऱ्याला पाच दिवसांत भारत सोडण्यास सांगितलं आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी स्वत: कॅनडाच्या या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं.
अनेक गुंड कॅनडात का आश्रय घेत आहेत?
निज्जर मारला गेला असला तरी भारताचे असे अनेक शत्रू आहेत जे कॅनडात लपून बसले आहेत. त्यांच्यापैकी अनेकांच्या डोक्यावर लाखो रुपयांचं बक्षीस आहे. हे गुन्हेगार कॅनडात मुक्तपणे फिरतात आणि वेळोवेळी विविध मेळाव्यांच्या नावाखाली भारताविरुद्ध विषही पेरतात. भारताला हवा असलेला खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर यानं जालंधरमध्ये एका पुजाऱ्याची हत्या केली होती. एनआयएने त्याच्यावर 10 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. असं असतानाही तो कॅनडात राहून जाहीरपणे भारताविरुद्ध गरळ ओकत होता आणि खलिस्तानी विचारसरणीला खतपाणी घालत होता. तसेच 'सीख फॉर जस्टिस' या नावानं दहशतवादी संघटना चालवणारा गुरपतवंतसिंग पन्नू यानेही अनेकदा भारताविरोधात बोलून खलिस्तानी विचारसरणीचा पुरस्कार केला आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येतील आरोपी गोल्डी ब्रार देथील तिथेच आहे.
कॅनडाकडून प्रत्यार्पणाची आशा नाही
कॅनडामध्ये लपून बसलेल्या सात गुन्हेगारांच्या विरोधात भारतानं रेड कॉर्नर नोटीससह अनेक पुरावे डॉसियरच्या स्वरूपात कॅनडाकडे सुपूर्द केले आहेत. असं असूनही कॅनडाच्या सरकारनं याची कधीही दखल घेतली नाही. या गुन्हेगारांच्या प्रत्यर्पणाची फारशी आशा नाही. इतिहास याचा साक्षी आहे. जस्सी ऑनर किलिंग प्रकरणातील दोन्ही आरोपींना कॅनडातून भारतात आणण्यासाठी 18 वर्षे लागली होती.
एनडीपी खलिस्तानच्या समर्थनात आहे का?
आता प्रश्न असा आहे की कॅनडा असं का करत आहे? त्याचं भारताशी काय वैर आहे? कॅनडातील अंतर्गत राजकारण याला कारणीभूत आहे. तेथील राजकारणात आता खलिस्तानचे समर्थक असलेल्या घटकांचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप होत आहे. हे प्रकरण अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, तुम्ही ट्रूडो समर्थक, माजी खलिस्तानी आणि एनडीपी नेते जगमितसिंग यांच्या मुलाखती ऐकल्या पाहिजे.
आपल्याच देशात टीकेचे बळी ठरले ट्रुडो
राजकीय प्रवेशापूर्वी जगमितसिंग खलिस्तानी रॅलींचा एक महत्त्वाचा चेहरा होते. आजकाल ट्रुडो यांचं सरकार या एनडीपी पक्षाच्या आधारवर टिकून आहे. म्हणजेच आपली खुर्ची वाचवण्यासाठी ट्रुडो हे इतर देशाचे शत्रू असलेल्या घटकांशी हातमिळवणी करत आहेत. योगायोगाने सध्या हे शत्रुत्व जगातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या देशांपैकी एक असलेल्या भारताशी आहे. यामुळेच ट्रुडो यांना जगभरातूनच फटकारले जात आहे. त्यांच्याच देशातील अनेक नेत्यांनीही त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
Canada Visa Service : मोठा निर्णय! कॅनडाचे नागरिक भारतात येऊ शकणार नाहीत, व्हिसा सेवा स्थगित
कॅनडामध्ये राहतात सात लाख शीख
कॅनडाची एकूण लोकसंख्या सुमारे 38.25 दशलक्ष आहे. यामध्ये भारतीय वंशाचे 24 लाख लोक आहेत. या पैकी सुमारे सात लाख लोकसंख्या शीखांची आहे. ते ग्रेटर टोरंटो, व्हँकुव्हर, एडमंटन, ब्रिटिश कोलंबिया आणि कॅलगरी सारख्या ठिकाणी राहतात. या सात लाख शिखांमध्ये खलिस्तानचे अनेक समर्थक आहेत आणि पंतप्रधान ट्रूडो नेहमीच या व्होटबँकेवर लक्ष ठेवून असतात.
करिमाच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला नाही
परिस्थिती अशी आहे की, ट्रुडो आपल्या पदासाठी खलिस्तानींच्या मृत्यूमुळे व्यथित होत आहेत. पण, कॅनडात होणाऱ्या बलुचांच्या हत्येवर त्यांनी मौन बाळगले आहे. पत्रकार करिमा बलोच यांचा मृत्यू हा त्याचा पुरावा आहे. डिसेंबर 2020 मध्ये, बलुचिस्तानमधील रहिवासी असलेल्या 37 वर्षीय करिमा बलोच यांचा मृतदेह टोरंटोमधील नदीच्या काठावर सापडला होता. करिमा बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढत होत्या. त्यांच्या हत्येसाठी पाकिस्तानी लष्कर जबाबदार असल्याचं कुटुंबियांचं म्हणणं होतं. याबाबत कॅनडा सरकारनं काहीही भूमिका घेतली नाही. तीन वर्षांनंतरही करीमा आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळालेला नाही.
ट्रुडो यांना आपलं पद वाचवायचं आहे आणि त्यासाठी ते खलिस्तानींची मदत घेण्यास मागे-पुढे बघत नाहीत. अशा स्थितीत खलिस्तानींचा उत्साहही उंचावला आहे. भारतानं वारंवार आक्षेप घेतल्यानंतरही G-20 बैठकीदरम्यान कॅनडात वेगळ्या खलिस्तान देशासाठी मतदान झालं. म्हणजेच जस्टिन ट्रुडो जेव्हा भारतात आदरातिथ्य स्वीकारत होते त्याचवेळी भारतात मिळालेला आदर विसरून त्यांचं सरकार कॅनडात भारतविरोधी कारवायांना खतपाणी घालत होतं. भारतातून मायदेशी गेल्यानंतर ट्रुडो यांनी लगेचच भारतावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे त्यांनी हे वक्तव्य जाणीवपूर्वक केल्याची चर्चा सध्या जागतिक राजकारणात सुरू आहे.
कॅनडाशिवाय, इतर अनेक देशांमध्ये भारतातील मोस्ट वाँटेड गुन्हेगार वास्तव्याला आहेत. यामध्ये पाकिस्तान, मलेशिया, फिलिपिन्स आणि ब्रिटनचाही समावेश आहे. त्यापैकी काही जणांचा परदेशातच त्यांच्या शत्रूंनी जीव घेतला तर काहींना अटक करण्यात भारतीय तपास यंत्रणांना यश आलं आहे.