लँडर आणि रोव्हर मॉड्युलला स्लीप मोडमधून उठवण्यासाठी होतील प्रयत्न
इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, इस्रोमधील एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे की, गुरुवारी किंवा शुक्रवारी जास्तीत जास्त सूर्यप्रकाश उपलब्ध झाल्यानंतर ग्राउंड स्टेशनवरून लँडर, रोव्हर मॉड्युल आणि ऑन-बोर्ड उपकरणं पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न होईल. मात्र, ते पुन्हा काम करण्याची शक्यता फारच कमी आहे. पण, ही एकदमच निराशाजनक स्थितीही नाही. हे देखील शक्य आहे की, प्रयत्न केल्यास लँडर किंवा रोव्हर मॉड्युल स्लीप मोडमधून जागं होईल. जागे झाल्यानंतर ते पूर्ण क्षमतेनं कार्य करतील की नाही, याबाबत शंका आहे.
advertisement
पुढील 14 दिवस काम करू शकतात लँडर आणि रोव्हर
इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, सौरउर्जेवर चालणाऱ्या चांद्रयान-3 मॉड्युल मिशनचे आयुष्य केवळ एक चंद्र दिवस होतं. चंद्रावरील एक दिवस म्हणजे पृथ्वीवरील सुमारे 14 दिवसांच्या बरोबरीचा असतो. लँडर आणि रोव्हर मॉड्युलमधील इलेक्ट्रॉनिक्स चंद्रावरील अत्यंत थंड रात्रीच्या तापमानाला तोंड देण्यासाठी डिझाइन केलेलं नव्हतं. चांद्रयान-3 जिथे उतरलं तेथील तापमान -200 डिग्री सेल्सिअसपेक्षाही खाली जातं. या परिस्थीतीचा सामना करून जर लँडर आणि रोव्हर स्लीप मोडमधून जागे झाले, तर ते पुढे पृथ्वीवरील किमान 14 दिवस काम करत राहू शकतात.
रोव्हरनं 100 मीटर अंतरावर केला प्रवास
चंद्रावर गेल्यानंतर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने पृथ्वीवरील शास्त्रज्ञांना महत्त्वाची माहिती पाठवली आहे. या डेटाच्या आधारे चंद्राशी संबंधित विविध प्रकारची माहिती समोर आली आहे. इस्रोनं सांगितलं होतं की प्रज्ञान रोव्हरनं 100 मीटरचे अंतर कापलं आहे. हे अंतर कापण्यासाठी रोव्हरला सुमारे 10 दिवस लागले. इस्रोनं सोशल मीडिया साइट X वर (ट्विटर) लँडर आणि रोव्हरमधील अंतराचा आलेख देखील शेअर केला होता. 6-चाकी प्रज्ञान रोव्हरचं वजन 26 किलो आहे.
भारताचं चांद्रयान-3 हे यान 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं होतं. यानंतर चांद्रयान-3मधील प्रज्ञान नावाचं रोव्हर हे विक्रम लँडरमधून बाहेर आलं. 14 दिवस चंद्राच्या पृष्ठभागावरून सतत डेटा पाठवल्यानंतर 4 सप्टेंबर 2023 रोजी दोघेही स्लीप मोडमध्ये गेले आहेत. विक्रम आणि प्रज्ञान यांनी 14 दिवसांच्या दीर्घ झोपेत जाण्यापूर्वी उत्कृष्ट काम केलं होतं.