इस्रोचे माजी अध्यक्ष के. सिवन म्हणाले की लँडर आणि रोव्हरला जागं करण्याच्या प्रयत्नात अनेक नवीन गोष्टी समोर येतील अशी आशा आहे. “आम्हाला वाट बघावी लागेल. ती लुनार रात्र गेली. आता लुनार दिवस सुरू होतो. त्यामुळे आता तो जागं होण्याचा प्रयत्न करेल. सर्व यंत्रणा कार्यान्वित झाल्या तर ठीक होईल...पण तसं झालं नाही तरीही हरकत नाही. भविष्यात नवीन वैज्ञानिक पद्धती विकसित होतील. आताही चांद्रयान-1 च्या डेटाने अनेक शोध लावले आहेत. त्यामुळे अनेक नवीन गोष्टी समोर येतील अशी आशा आहे. शास्त्रज्ञ प्रयत्न करत राहतील. त्यामुळे, हा कथेचा शेवट नाही,” असं ते म्हणाले.
advertisement
इस्रोने एक्सवर पोस्ट केली आहे. "आज चंद्रावरील शिवशक्ती पॉइंटवर सूर्योदय होणं अपेक्षित आहे आणि लवकरच विक्रम आणि प्रज्ञान यांना वापरण्यायोग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळेल. आम्ही विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर 22 सप्टेंबर रोजी त्यांच्याशी पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू करण्यापूर्वी एका विशिष्ट तापमानापेक्षा जास्त गरम होण्याची प्रतीक्षा करू," असं त्यात म्हटलं आहे.
भारताचे चांद्रयान-3 हे 14 जुलै रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते. 23 ऑगस्ट रोजी ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले. तेव्हापासून, प्रज्ञान आणि विक्रम या दोघांनी इस्रोकडे खूप सारा डेटा पाठवला आहे, त्यापैकी काही डेटा इस्रोने सार्वजनिक केला. मिशनच्या यशानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात विक्रम लँडरचा लँडिंग पॉइंट 'शिवशक्ती' म्हणून ओळखला जाईल, अशी घोषणा केली.