विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडमध्ये आहेत. चंद्रावर त्यांना सूक्ष्म उल्कापिंडाचा सर्वांत मोठा धोका आहे. कारण या उल्कापिंडाचा चंद्राच्या पृष्ठभागावर सतत भडिमार होत असतो. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं, की, 'रोव्हर प्रज्ञान आणि विक्रम लँडर या दोघांवर चंद्राच्या पृष्ठभागावर सतत भडिमार करणाऱ्या मायक्रोमेटोरॉइड्सचा परिणाम होऊ शकतो. इस्रोला याची जाणीव आहे. कारण आधीच्या इतर मोहिमांनाही त्याचा फटका बसला होता. त्यात चंद्राच्या पृष्ठभागावर सोडलेल्या अपोलो अंतराळयानाचादेखील समावेश होता.'
advertisement
किरणोत्सर्गाचा धोका
मणिपाल सेंटर फॉर नॅचरल सायन्सेसचे प्राध्यापक आणि संचालक डॉ. पी . श्रीकुमार यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे, की 'चंद्रावर वातावरण किंवा ऑक्सिजन नसल्यामुळे झिजण्याचा धोका नाही. परंतु, दीर्घ चंद्र रात्रीच्या थंड तापमानाव्यतिरिक्त मायक्रोमेटिओरॉइडच्या प्रभावामुळे अवकाशयानाचं आणखी नुकसान होऊ शकते का हे पाहणं बाकी आहे. चंद्रावर वातावरण नसल्यामुळे सूर्याच्या किरणोत्साराचा सतत भडिमार होत असतो. यामुळे चांद्रयान-3चंही काही नुकसान होऊ शकते. तथापि, आमच्याकडे याबद्दल जास्त डाटा नसल्याने पुढे काय होईल हे आम्हाला अद्याप माहिती नाही.'
चंद्रावरची धूळ रोव्हर आणि लँडरला खराब करेल का?
एवढंच नाही, तर चंद्रावरची धूळ विक्रम लँडर आणि रोव्हर प्रज्ञानच्या पृष्ठभागावरही पोहोचेल. चंद्रावर हवा नसल्यामुळे तिथली धूळ रोव्हर आणि लँडरला चिकटू शकते. चांद्रयान-3 वर धूळ कशी जागा व्यापते याची पुष्टी करण्यासाठी डेटा उपलब्ध आहे. तसंच अपोलो मोहिमेदरम्यान आढळून आलं होतं. तथापि, चांद्रयान-3 च्या आतापर्यंतच्या कामगिरीवर इस्रोचे शास्त्रज्ञ समाधानी आहेत. कारण ज्या उद्देशाने चांद्रयान-3 तयार केलं होतं, ते कार्य त्याने पूर्ण केलं. स्लीप मोडमध्ये जाण्यापूर्वी 14 दिवसांची मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली.
इस्रोच्या प्रमुखांनी दिले चांद्रयान -3 चे अपडेट
इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'चांद्रयान -3चा रोव्हर प्रज्ञान हा चंद्राच्या पृष्ठभागावर सुप्तावस्थेत आहे. तो पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चांद्रयान-3 मोहिमेचं उद्दिष्ट सॉफ्ट लँडिंग हे होतं. त्यानंतर पुढचे 14 दिवस प्रयोग केले गेले आणि आवश्यक सर्व डेटा गोळा करण्यात आला.'
इस्रोच्या प्रमुखांना अजूनही रोव्हर आणि लँडर सक्रिय होण्याची आहे आशा
सोमनाथ यांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं, की 'आता ते तिथे शांत झोपलेत... त्यांना नीट झोपू द्या... आपण त्यांना त्रास द्यायला नको. जेव्हा त्यांना स्वतःहून उठायचं असेल तेव्हा ते उठतील... मला आत्ता एवढंच म्हणायचं आहे.'. रोव्हर पुन्हा सक्रिय होईल अशी इस्रोला अजूनही आशा आहे का, असं विचारलं असता ते म्हणाले, की 'आशा बाळगण्यास हरकत नाही.' सोमनाथ यांनी आशेची कारणं सांगतली. ते म्हणाले, ''या मिशनमध्ये लँडर आणि रोव्हरचा समावेश होता. लँडरची रचना मोठी असल्याने त्याची पूर्ण चाचणी होऊ शकली नाही. जेव्हा उणे 200 अंश सेल्सियस तापमानात रोव्हरची चाचणी घेण्यात आली तेव्हा ते कमी तापमानात काम करत असल्याचं आढळून आले. चांद्रयान-3 मोहिमेचं उद्दिष्ट पूर्ण झालं आहे. इस्रो मिशनद्वारे संकलित केलेल्या वैज्ञानिक डेटाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे.'
चांद्रयान-3 चंद्रावर केव्हा उतरलं होतं?
गेल्या 23 ऑगस्टला चंद्रावर उतरल्यानंतर लँडर, रोव्हर आणि पेलोड यांनी एकामागून एक प्रयोग केले, जेणेकरून ते पृथ्वीच्या 14 दिवसांत पूर्ण करता येतील. चंद्रावरचा एक दिवस पृथ्वीवरच्या 14 दिवसांच्या बरोबरीचा असतो. पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह असलेल्या चंद्रावर रात्र होण्यापूर्वी अनुक्रमे 4 आणि 2 सप्टेंबर रोजी लँडर आणि रोव्हर दोन्ही स्लीप मोडमध्ये गेले होते. इस्रोने 22 सप्टेंबर रोजी सांगितलं होतं, की त्यांनी आपल्या चांद्रमोहिमेतल्या चांद्रयान-3च्या लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांच्याशी संपर्क साधून त्यांची सक्रिय स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, अद्याप त्यांच्याकडून कोणतेही सिग्नल्स मिळालेले नाहीत.