मात्र बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाविरोधात कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कळते आहे. सर्वोच्च न्यायालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरन्यायाधीश गवई यांनी अधिकाऱ्यांना ही घटना दुर्लक्षित करण्याचे निर्देश दिले आहेत. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी संयम राखत कोणतीही कारवाई न करण्याची भूमिका घेतली आहे. न्यायालयीन वर्तुळात त्यांच्या या निर्णयाची विशेष दखल घेतली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या बार कौन्सिलने राकेश किशोर याचे सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई केली.
advertisement
घटनेनंतर सरन्यायाधीश गवई काय म्हणाले?
आरोपीला न्यायालयातून बाहेर नेल्यानंतरही या घटनेची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. मात्र सरन्यायाधीश गवई यांनी आपण अशा घटनांनी विचलित होत नाही किंबहुना प्रभावितही होत नाही. कामकाज सुरू करू, असे म्हणून त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली. या संपूर्ण घटनेनंतर सरन्यायाधीश गवई अतिशय शांत होते. त्यांनी अतिशय संयमाने परिस्थिती हाताळली.
नेमकी घटना काय?
सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यानंतर एका ज्येष्ठ वकिलाने पायातील बूट काढून सरन्यायाधीश गवई यांच्या दिशेने भिरकाविण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायालयात उपस्थित सुरक्षारक्षकांनी तसेच पोलिसांनी तत्काळ आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीला न्यायालयाच्या बाहेर नेत असताना सनातनचा अपमान सहन करणार नाही, असे म्हणत त्याने सरन्यायाधीश गवई यांचा निषेध केल्याचे उपस्थितीतांनी सांगितले.
आरोपी वकील नेमका कोण?
सरन्यायाधीश गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा आरोपी वकिलाचे नाव राकेश किशोर असे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते सर्वोच्च न्यायालयात वकिली करतात. राकेश किशोर हा सर्वोच्च न्यायालयातील बारचा २०११ पासून सदस्य आहे.
...तर ही घटना गंभीर संदेश देणारी, मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून हल्ल्याचा निषेध
दुसरीकडे सरन्यायाधीश गवई यांच्यावरील हल्ल्याच्या प्रयत्नाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी चौकशीची मागणी केली. आपल्या हुशारीने आणि चिकाटीने सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीवर असा हल्ला होत असेल तर ही घटना गंभीर संदेश देणारी आहे, असे राज्यसभेचे वरिष्ठ सदस्य तथा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. तसेच धर्मांधतेने समाजाला किती ग्रासले आहे, हे यावरून दिसून येते, असेही ते म्हणाले.