अधीर रंजन चौधरी यांनी सांगितलं की, १९७६ मध्ये एका सुधारणेनंतर धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे दोन शब्द जरी प्रस्तावनेत समाविष्ट केले असले तरी आज आम्हाला जी प्रत दिली त्यात हे दोन्ही शब्द नाहीत. ही बाब चिंतेची आहे. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सरकारवर प्रश्न उपस्थित करताना म्हटलं की,"त्यांचा उद्देश संशयास्पद आहे. खूप चातुर्याने हे करण्यात आलं असून आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे. मी हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला पण मला संधी मिळाली नाही."
advertisement
नव्या संसद भवनात मंगळवारपासून कामकाजाला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ सर्व खासदार चालत जुन्या संसदेतून नव्या संसदेत गेले. यावेळी खासदारांना संविधानाच्या प्रतींचे वाटप करण्यात आले. अधीर रंजन चौधरी म्हणाले की, आम्हाला दिलेल्या संविधानामद्ये समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष शब्द प्रस्तावनेत नाहीत. मी राहुल गांधींशीसुद्धा याबाबत बोललो.
अधीर रंजन चौधरी यांच्या आरोपानंतर सरकारकडून उत्तर देण्यात आलं आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं की, संविधान जेव्हा तयार झालं तेव्हा ते असंच होतं. त्यानंतर ४२ वी सुधारणा झाली. सर्व खासदारांना जे संविधान दिले आहे त्या संविधानाची मूळ प्रत आहेत. प्रल्हाद जोशी यांच्याशिवाय केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनीही उत्तर दिलं असून ते म्हणाले की, संविधानाचा मसुदा तयार केला होता तेव्हा तो असाच होता. त्यात नंतर सुधारणा केली गेली. ही मूळ प्रत आहे आणि आमच्या प्रवक्त्यांनी यावर उत्तर दिलं आहे.