पहलगाम हल्ला, केंद्र सरकारने राबविलेले ऑपरेशन सिंदूर, आणि शस्त्रसंधीची घोषणा करताना अमिरेकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी यावर संसदेत वादळी चर्चा सुरू आहे. या चर्चेत मंगळवारी प्रियांका गांधी यांनी सहभाग नोंदवला. जवळपास २८ मिनिटांच्या भाषणात त्यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावत काँग्रेस सरकार काळातील आक्षेपांवरही उत्तरे दिली. अत्यंत शांत पद्धतीने आणि संयमाने त्यांनी एक एक मुद्दा सभागृहासमोर मांडून हल्ल्याची तीव्रता देशआला अवगत केली. त्याचवेळी अमित शाह यांनी सोनिया गांधी यांच्या अश्रूंवर केलेल्या टीकेलाही समर्पक उत्तर दिले. भाषणाच्या शेवटी जेव्हा त्यांनी पहलगाममधील शहीद नागरिकांची नावे वाचायला सुरुवात केली त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी जोरदार गोंधळ घातला. त्यावेळी विरोधकांनीही देखील त्यांना उत्तर दिले.
advertisement
जनतेप्रति सरकारचे उत्तरदायित्व आहे की नाही?
देशभरातील पर्यटक पहलमगामध्ये सरकारच्या भरोशावर गेले होते. मात्र सरकारची कुठलीही सुरक्षा व्यवस्था बैसरन घाटीत नव्हती. सबंधित लोकांना सरकारने रामभरोसे सोडले. या लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची नव्हती का? गृहमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय काय करत होते? जनतेप्रति सरकारचे उत्तरदायित्व नव्हते का? सरकारची गुप्तचर यंत्रणेचे हे अपयश नव्हते का? असे प्रश्न विचारीत प्रियांका गांधी यांनी सरकारला कोंडीत पकडले.
भूतकाळाचं काय सांगता, मला वर्तमानाची उत्तरे द्या
हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कानपूर येथील शुभम द्विवेदीचा उल्लेख करताना प्रियांका म्हणाल्या,शुभम त्याच्या कुटुंबासह पहलगामच्या दऱ्याखोऱ्याचा आनंद घेण्यासाठी गेला होता, परंतु दहशतवाद्यांनी शुभमला त्याच्या पत्नीसमोर गोळ्या घातल्या. शुभमसारखे अनेक लोक शांत काश्मीरच्या सरकारच्या दाव्यांवर विश्वास ठेवून तिथे गेले होते, परंतु सुरक्षेच्या नावाखाली त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले. त्याची जबाबदारी कोण घेणार? सेना प्रमुखांनी राजीनामा दिली की गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला? राजीनामा सोडा त्यांनी जबाबदारीही घेतली नाही. तुम्ही भूतकाळात जाऊन काँग्रेस काळातील निर्णयांवर आक्षेप घेत आहात परंतु मी वर्तमानावर बोलतेय. मला वर्तमानाची उत्तरे द्या, असेही प्रियांकांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले.
भाजपचा मुंबई हल्ल्यावर प्रश्न, प्रियांकांचा पलटवार, इतिहास ऐकवला
मुंबई हल्ल्यानंतर तत्कालिन मनमोहन सिंग यांच्या सरकारने काय केले? असे भाजपवाले विचारतात. मला त्यांना सांगायचे आहे की हल्ला सुरू असतानाच आम्ही दहशतवादी मारले होते आणि एका दहशतवाद्याला जिवंत पकडले होते ज्याला नंतर आम्ही फाशी दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देशाच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला होता, असा इतिहास सांगत मुंबई हल्ल्यावरच्या प्रश्नांना प्रियांकांनी उत्तरे दिली.
भाषणाच्या शेवटी गदारोळ, संसदेत राडा
प्रियांका गांधी यांच्या भाषणाच्या शेवटी त्यांनी पहलगाममध्ये मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे वाचून दाखवली. पहलगाममध्ये आपल्यासारखीच हाडामांसाची माणसे मृत्यूमुखी पडली, हे देशातल्या जनतेला सांगायचे आहे, असे त्या म्हणाल्या. त्यावर सत्ताधाऱ्यांनी हिंदू मारले गेले, अशा प्रतिक्रिया दिल्या. त्यावर प्रियांका गांधी यांनी भारतीय नागरिक होते, असे उत्तर दिले. प्रियांकांनी नावे वाचायला सुरुवात करताच सत्ताधाऱ्यांनी हिंदू हिंदू अशी घोषणाबाजी करायला सुरुवात केली त्यावर विरोधकांनी देखील भारतीय भारतीय असे नारे दिले. प्रियांका गांधी यांच्या भाषणाच्या अखेरच्या दोन मिनिटांत संसदेत गोंधळ पाहायला मिळाला. त्यावर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना हस्तक्षेप करायला लागला. त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना शांत केले.