मार्च 2018 मध्ये एका तरुणीचे लग्न झाले होते, मात्र लग्नानंतर काही महिन्यांतच ती रहस्यमयरीत्या बेपत्ता झाली. नोव्हेंबर 2018 मध्ये तिच्या वडिलांनी न्यायालयात धाव घेतली आणि आरोप केला की, "हुंड्याच्या लोभापायी सासरच्या मंडळींनी माझ्या मुलीची हत्या केली आणि पुरावे नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह गायब केला." न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेत सासरच्या पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
advertisement
पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करताच अटक होण्याच्या भीतीने पती, सासू-सासरे आणि इतर नातेवाईक घरदार सोडून फरार झाले. अनेक महिने पोलीस त्यांचा शोध घेत होते, पण ते सापडले नाहीत. अखेर हे प्रकरण रफादफा करण्यासाठी वडिलांनी मोठी रक्कम घेतल्याचीही चर्चा आहे. न्यायालयाने तडजोडीनंतर प्रकरण शांत केलं होतं, पण पोलीस तपास सुरूच होता. तपास अधिकारी मोसम कुमार यांना गुप्त माहिती मिळाली की, ही महिला जिवंत असून तिच्या माहेरी आली आहे. पोलिसांनी तातडीने छापा टाकून तिला ताब्यात घेतलं.
तिची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. ती म्हणाली, "लग्नानंतर मला सासरी राहायचं नव्हतं, म्हणून मी कोणालाही न सांगता गुजरातच्या अहमदाबादला पळून गेले. तिथे मी दुसऱ्या एका तरुणाशी लग्न केलं, मला आता एक मुलगाही आहे. तिथे मी आनंदाने राहत आहे." या महिलेने स्पष्ट केलं की, तिच्या सासरच्यांनी कधीही हुंड्याची मागणी केली नव्हती किंवा तिचा छळ केला नव्हता. तिच्या वडिलांनी सासरच्यांना अडकवण्यासाठी खुनाचा खोटा बनाव रचला होता. आता ही महिला पुन्हा आपल्या पतीकडे आणि मुलाकडे अहमदाबादला जाण्याच्या तयारीत आहे.
मोतिहारी एसपींनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. "एका खोट्या तक्रारीमुळे निर्दोष लोकांची आयुष्ये उद्ध्वस्त होतात आणि पोलिसांचा वेळही वाया जातो," असे त्यांनी म्हटले आहे. आता या प्रकरणात सासरच्या लोकांना निर्दोष मुक्त केले जाईल आणि मुलीच्या पित्यावर खोटी तक्रार केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
