चेन्नई: तमिळनाडूच्या करूर जिल्ह्यात तमिळगा वेत्री कळगम (TVK) प्रमुख आणि अभिनेत्यापासून नेते बनलेले विजय यांच्या मोठ्या राजकीय सभेत प्रचंड गर्दी झाली. दहा हजारो लोक जमल्याने परिस्थिती बिघडली आणि चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली. यात किमान 33 लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अनेकजण बेशुद्ध पडले आणि त्यांना तातडीने वैद्यकीय मदतीची गरज भासली. या घटनेत 58 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
advertisement
गर्दीमुळे अनेक लोक, त्यात काही मुलेसुद्धा, बेशुद्ध पडली. विजय यांनी अचानक आपलं भाषण थांबवलं आणि “पोलिसांनी मदत करा” अशी हाक दिली. लोक बेशुद्ध पडल्यावर त्यांनी पाणी बाटल्या प्रेक्षकांत टाकल्या आणि रुग्णवाहिका बोलावून श्वास गुदमरलेल्या लोकांना रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की- विजय यांच्या भाषणादरम्यान गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि लोकांना श्वास घेणं अवघड झालं. अनेक कार्यकर्त्यांनी परिस्थितीची जाणीव होताच सतर्कतेचा इशारा दिला. मात्र रुग्णवाहिकांना गच्च भरलेल्या गर्दीतून वाट काढणं अवघड झालं. बेशुद्ध पडलेल्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. त्यापैकी काहींचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे निर्देश
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी तातडीने मंत्री अनबिल महेश आणि मा. सुब्रमणियन यांना घटनास्थळी पाठवण्याचे आदेश दिले.
स्टॅलिन यांनी एक्स (माजी ट्विटर)वर लिहिले: करूरमधून येणारे अहवाल चिंताजनक आहेत. बेशुद्ध पडलेल्या आणि गर्दीच्या दाबामुळे रुग्णालयात दाखल झालेल्यांना तातडीने वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी मी माजी मंत्री @V_Senthilbalaji, माननीय मंत्री @Subramanian_Ma आणि जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
ते पुढे म्हणाले: शेजारच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील मंत्री @Anbil_Mahesh यांनाही तातडीने मदत करण्यास सांगितलं आहे. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ADGPला तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
विजय यांची राजकीय पार्श्वभूमी
विजय यांच्या राजकीय प्रचार सभांभोवती याआधीपासून वाद निर्माण होत आहेत. डीएमके सरकारने त्यांच्या सभांमध्ये प्रचंड गर्दी होत असल्यामुळे काही निर्बंध लादले होते. याबाबत विजय यांनी गेल्या आठवड्यातच प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं: लोकांना भेटायचं आहे म्हणून माझ्यावर निर्बंध का? तुमचा हेतू काय आहे? मी पुन्हा सांगतो – २०२६ ची लढत फक्त TVK आणि DMK यांच्यातच आहे.
विजय यांनी आपल्या पक्षाला डीएमके आणि एआयएडीएमके या दोन्ही पक्षांना पर्याय म्हणून उभं केलं आहे. त्यांनी आपल्या सभांमध्ये वारंवार डीएमके आणि भाजप या दोन्ही पक्षांवर हल्ला चढवला आहे. विजय यांनी स्पष्ट केलं आहे की ते या दोन्ही पक्षांशी कोणतेही आघाडी करणार नाहीत. राज्य सरकारवर टीका करताना त्यांनी म्हटलं की – जनतेला रस्ते, आरोग्यसेवा, स्वच्छ पाणी आणि सुरक्षितता यांसारख्या मूलभूत सुविधा देण्यात सरकार अपयशी ठरलं आहे.