दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मंगळवारी मतदान संपन्न झाले. ६९९ उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद झाले असून शनिवारी ८ फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा निकाल लागेल. आम आदमी पक्ष सलग तिसऱ्यांदा सत्तेत येणार की महाराष्ट्र आणि हरियाणाप्रमाणे भारतीय जनता पक्ष मुसंडी मारणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
चाणक्यच्या मतदानोत्तर चाचणीचा काय अंदाज?
चाणक्यच्या मतदानोत्तर चाचणीच्या अंदाजानुसार आम आदमी पक्ष २५ ते २८ जागा जिंकण्याची शक्यता आहे तर भारतीय जनता पक्ष ३९ ते ४४ जागा जिंकण्याची शक्यता आहे. काँग्रेस उणेपुरे २ ते ३ जागा जिंकण्यात यश मिळवेल, असा चाणक्यचा अंदाज आहे.
advertisement
दिल्ली निवडणुकीत 'आप'ला धक्का?
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील मॅट्रिझच्या सर्वेक्षणानुसार आम आदमी पक्षाला ३२ ते ३७ जागा मिळतील तसेच भाजपला ३५ ते ४० तर काँग्रेसला शून्य ते एक जागा मिळण्याची शक्यता आहे.
दिल्लीतील टॉप फाईट
दिल्ली निवडणुकीत अनेक जागेवर चुरशीची लढत आहे. अरविंद केजरीवाल, आतिशी, परवेश वर्मा, रमेश बिधुरी आणि कैलाश गहलोत यांच्या सारखे प्रमुख नेते मैदानात आहेत. नवी दिल्लीची जागा सर्वात हाय-प्रोफाइल लढत ठरणार आहे. इथं आपचे नेते अरविंद केजरीवाल, भाजपचे प्रवेश वर्मा आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांच्यात स्पर्धा आहे.
पटपरगंज मतदारसंघात आपचे अवध ओझा, भाजपचे रविंदर सिंग नेगी आणि काँग्रेसचे अनिल चौधरी यांच्यात लढत आहे. वायव्य भागातील रोहिणी मतदारसंघात आपचे प्रदीप आणि भाजपचे विजेंद्र गुप्ता यांच्यात लढत आहे.
कालकाजी मतदारसंघात दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी, भाजपचे माजी खासदार रमेश बिधुरी आणि काँग्रेसच्या अलका लांबा यांच्यात तिरंगी लढत होत आहे. जंगपुरा मतदारसंघातून आपचे मनीष सिसोदिया, भाजपचे सरदार तरविंदर सिंग मारवाह आणि काँग्रेसचे फरहाद सुरी निवडणूक रिंगणात आहेत.