सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाल किल्ल्याजवळ ज्या कारमध्ये स्फोट झाला, ती I 20 कार 2014 पासून तब्बल चार जणांना विकण्यात आली होती. सगळ्यात आधी सलमान नावाच्या व्यक्तीने 18 मार्च 2014 रोजी ही कार विकत घेतली होती. त्यानंतर ती देवेंद्र नावाच्या व्यक्तीला विकण्यात आली. पुढे ही कार सोनूकडे गेली. अखेरीस तारिक यांच्यापर्यंत पोहोचली.
advertisement
या कार खरेदी विक्रीच्या व्यवहारात फरीदाबादमधील एका कार डिलरचाही सहभाग असल्याचं उघड झाले आहे. विशेष म्हणजे, कारची मालकी अधिकृतरीत्या बदलण्यात आली नव्हती. ही कार बेकायदेशीरपणे विकण्यात आली होती. घटनेच्या दिवशी ही कार उत्तर दिल्ली परिसरात दुपारी एकच्या सुमारास दिसून आली होती. आतापर्यंत ५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असून कार कुठे कुठे गेली? याचा सगळा मार्ग समोर आला आहे. काश्मिरी गेट, दरियागंज, सुनेहरी मशीद आणि लाल किल्ला परिसरात ही कार फिरल्याचं आढळून आलं.
ही कार शेवटी ज्या तारिकला विकण्यात आली. तो तारिक हा जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथील रहिवासी आहे. 2019 मध्ये पुलवामा येथे केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्सच्या जवानांना टार्गेट करण्यात आलं होतं. स्फोटाने भरलेल्या कारने जवानांच्या वाहनाला धडक देण्यात आली होती. ज्यात ४० जवानांचा मृत्यू झाला होता. आता दिल्ली स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर आल्याने यात दहशतवादी हल्ल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अद्याप या स्फोटाची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेनं घेतलेली नाहीये.
