घटनास्थळावरून समोर आलेल्या व्हिडिओमध्ये लोकांच्या किंकाळ्या ऐकू येत आहेत. पूराच्या प्रचंड लाटा घरे गिळंकृत करत असल्याचे भयावह दृश्य दिसून आले. या पुरामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले असून, काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याच्या देखील बातम्या आहेत. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये पाण्याच्या तुफानी लाटांनी घरे आणि इमारती कोसळल्याचे दृश्य पाहायला मिळाले. स्थानिक रहिवासी भीतीने ओरडताना दिसून आले.
advertisement
राज्य आपत्ती निवारण दलाच्या (SDRF) बचाव पथकांना घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. उत्तराखंड सरकारने देखील बचावकार्यासाठी भारतीय लष्कराची मदत घेतली आहे.
खीर गंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने धराली बाजार परिसरात मोठे नुकसान झाले आहे. हर्षिलमधून लष्कराचे पथक, पोलिस आणि SDRF पथक भटवारीकडे रवाना झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुराच्या आधी आणि नंतर...
सीएनएन-न्यूज १८ शी बोलताना राज्याचे मंत्री सौरभ बहुगुणा यांनी या भयावह घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचे प्राण वाचवणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले. ही अत्यंत दु:खद घटना आहे. बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचे प्राण वाचवणे हे आमचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. NDRF, SDRF घटनास्थळी पोहोचत आहेत, असे त्यांनी सांगितले.
डोळ्यांनी पाहिलेलं वास्तव
डोळ्यादेखत ही घटना पाहणारे सुरेश सेमवाल यांनी CNN-News18 ला सांगितले की, अनेक हॉटेल्स या पूरामध्ये वाहून गेले आहेत. परिस्थिती खूपच वाईट आहे. अनेक हॉटेल्स या अचानक आलेल्या पुरामध्ये वाहून गेली आहेत. या भागातील जवळपास 50 हॉटेल्स पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. अनेक गावकरी सध्या अडकलेले आहेत, असे ते म्हणाले.
