गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोग आणि विरोधी पक्षांमध्ये तणावाचे वातावरण दिसून येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींनी नुकतेच निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी म्हटले होते की, आयोग सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करत असून मतदार यादीतील फेरफार आणि मतदान प्रक्रियेतील पारदर्शकतेवर त्यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. राहुल गांधींनी ट्विटर (X) आणि पत्रकार परिषदांमधून थेट टीका करत निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
advertisement
त्यांच्या आरोपांनंतर राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष आयोगाकडे आक्षेप घेत असताना, भाजप नेत्यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यांना "आधारहीन आणि निवडणुकीपूर्वीची राजकीय नौटंकी" असे संबोधले आहे. मात्र निवडणूक आयोगाची भूमिका काय आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पत्रकार परिषदेत आयोग निवडणुकीची तयारी, पारदर्शकतेसाठी उचललेली पावले आणि राहुल गांधींसह विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याचबरोबर आगामी निवडणुकीचा संभाव्य कार्यक्रम किंवा महत्वाचे निर्णय जाहीर होण्याचीही दाट शक्यता आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, ही पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण गेल्या काही दिवसांतील आरोप-प्रत्यारोपांमुळे निवडणूक आयोगावर विश्वासाचा प्रश्न निर्माण झाला असून आयोगाला आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे.