नवी दिल्लीतल्या चाणक्यपुरी भागात इज्रायल दूतवास आहे. या परिसरात स्फोट झाल्याचा अलर्ट दिल्ली पोलिसांना देण्यात आला होता. एका अज्ञात व्यक्तीने दिल्ली फायर सर्व्हिसला फोन करून याबाबतची माहिती दिली. स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांची स्पेशल सेलची टीम बॉम्ब निरोधक पथक घेऊन घटनास्थळी पोहोचली. इकडे कोणतीही संशयास्पद वस्तू मिळालेली नाही, असं दिल्ली अग्निशमन विभागाच्या प्रमुखांनी सांगितलं.
advertisement
घटनास्थळावर सापडलं पत्र
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या टीमला घटनास्थळावरून एक पत्र सापडलं आहे, ज्यावर इस्रायलच्या राजदूताला उद्देशून काहीतरी लिहिलं आहे. स्पेशल सेलच्या सूत्रांनी ही माहिती दिली. फॉरेन्सिक टीम हे पत्र सोबत घेऊन गेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी सापडलेल्या पत्राचा फोटो घेण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. बोटांचे ठसे जाणून घेण्यासाठी हे पत्र फॉरेन्सिक टीमला देण्यात आले आहे. पत्रावर झेंडाही काढण्यात आला होता.
इज्रायलच्या दूतावासाकडूनही स्फोट झाल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. 'संध्याकाळी 5 वाजून 48 मिनिटांनी दूतवासाजवळ एक स्फोट झाला. दिल्ली पोलीस आणि सुरक्षा टीम सध्या तपास करत आहे,' अशी प्रतिक्रिया इज्रायल दुतवासाचे प्रवक्ते गाय नी यांनी दिली.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचं पथकही घटनास्थळी पोहोचलं आहे. परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. परिसरातील प्रत्येक कोपऱ्याचा शोध घेतला जात आहे. अद्याप कोणतीही स्फोटके सापडली नसून शोध मोहीम सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.