ही कहाणी आहे अशाच एका दुर्दैवी तरुण जोडप्याची, ज्यांनी समाजाच्या, कुटुंबाच्या सगळ्या बंधनांना झुगारून प्रेमाला प्राधान्य दिलं. आणि त्याची किंमत त्यांना आपला जीव देऊन चुकवावी लागली.
एवढीच चूक: घरच्यांविरुद्ध जाऊन लग्न केलं!
त्या दोघांची चूक एवढीच होती की त्यांनी स्वतःच्या इच्छेने लग्न केलं. बहिणीचं प्रेम, तिचं स्वतंत्र आयुष्य हे सगळं तिच्या पाच भावांना पटले नाही. त्यांच्या डोळ्यांत प्रतिष्ठा मोठी ठरली आणि त्यांनी बहिणीला आणि तिच्या नवऱ्याला 'प्रेमाचा धडा शिकवण्याच्या' नावाखाली कायमचं संपवून टाकलं.
advertisement
'धूमधडाक्यात लग्न करू'चं खोटं आश्वासन
हृदय पिळवटून टाकणारी ही भयानक घटना घडली आहे उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात. पोलिस तपासात समोर आलं आहे की, मृत मुन्नी गुप्ता आणि तिचा पती दुखन साव यांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं आणि दोघं गुजरातमध्ये स्थायिक झाले होते. या जोडप्याला परत आणण्यासाठी, कुटुंबातील लोकांनी एक क्रूर कट रचला. त्यांना फसवून घरी बोलावलं आणि सांगितलं, "आता काय झालं ते झालं, आम्ही तुमचं लग्न धूमधडाक्यात करू." प्रेमावर आणि रक्ताच्या नात्यावर विश्वास ठेवून ते दोघेही परत आले. पण बिचाऱ्या जोडप्याला काय माहीत, इथे त्यांची वाट मृत्यूच्या जाळ्याने पाहत होती.
विश्वासघाताचा कळस आणि नृशंस हत्या
भावांनी मोठ्या प्रेमाने बहिणीला आणि तिच्या नवऱ्याला गाडीत बसवलं. 'बिहारकडे जात आहोत' असं सांगून त्यांनी प्रवासाला सुरुवात केली. पण हातीनाला परिसरात गाडी थांबवून त्यांनी दोघांवर हल्ला केला आणि त्यांची थंड डोक्याने हत्या केली. क्रूरतेचा कळस म्हणजे त्यांनी बहिणीचं शरीर घटनास्थळीच टाकलं, तर तिच्या नवऱ्याचे अवशेष दुसऱ्या ठिकाणी नेऊन फेकले.
पोलिसांनी आता या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली आहे. तर तीन अजूनही फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी वेगळी पथकं तैनात केली आहेत. या प्रकरणानंतर परिसरात संतापाचं वातावरण आहे. कारण 'प्रेम' या पवित्र आणि हळव्या भावनेवर पुन्हा एकदा रक्ताचं डाग लागलं आहे.