करनाल, 29 ऑगस्ट : 'चांद्रयान-3'च्या सॉफ्ट लँडिंगमुळे इस्रो आणि भारताचं जगभरात कौतुक झालं. तर, आता आणखी एका संशोधनाबाबत माहिती समोर आली आहे. ब्रह्मांडातील रहस्य उलगडण्यासाठी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संशोधन सहकार्य (IASC) संस्था आणि नासाकडून एका संयुक्त प्रोजेक्टवर ऑनलाईन काम सुरू आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यामध्ये भारतातील विद्यार्थ्यांनी 5 लघुग्रहांचा शोध लावला आहे. त्यामुळे देशभरात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण आहे.
advertisement
विशेष म्हणजे या संशोधन कार्यात शास्त्रज्ञांसह जगभरातील विविध शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात भारताकडून के सी वी देवगन मेमोरियल एस्टेरॉयड सर्च कॅम्पेनचे 20 पथकही सामील होते. यात हरियाणातील करनालच्या दयाल सिंह पब्लिक स्कूलमधील 3 पथकांचा समावेश होता. कॅम्पेनमध्ये सहभागी व्यक्तींकडून 12 लघुग्रहांचा शोध लावण्यात आला. त्यात दयाल सिंह पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी 5 लघुग्रह शोधले. या कामगिरीबाबत विद्यार्थ्यांचा शाळेत गौरव करण्यात आला.
शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणाल्या, 'आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संशोधन सहकार्य संस्थेकडून आयोजित करण्यात आलेल्या या लघुग्रह संशोधन कार्यात देश-विदेशातील विविध शाळा आणि महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यात करनालच्या 44 विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यांच्यावर परिक्रमण करणारे लघुग्रह आणि स्थिर लघुग्रह शोधण्याचं कार्य सोपवण्यात आलं होतं.
सूर्य आहे 'या' राशीत, 4 राशींसाठी शुभकाळ, 17 सप्टेंबरपर्यंत होणार मालामाल!
पुढे त्यांनी सांगितलं, 'आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी 5 लघुग्रह शोधले. यासाठी शाळेत 3 टीम बनवण्यात आल्या होत्या. आर्यभट्ट, सी. व्ही. रमण आणि एपीजे अब्दुल कलाम अशी या 3 टीमला नावं देण्यात आली होती. या विद्यार्थ्यांनी मंगळ ग्रहाभोवती परिक्रमण करणारे 5 लघुग्रह शोधले. ज्याला नासानेही मान्यता दिली आहे. या संशोधनासाठी अमेरिकेतील सर्वात मोठ्या टेलिस्कोपच्या मदतीने नासाकडून माहिती देण्यात आली होती. या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांनी सुमारे महिनाभर लघुग्रहांचं विश्लेषण करून त्यांचा शोध घेतला. लघुग्रहांच्या शोधानंतर आता नासा याबाबत सखोल संशोधन करेल. त्यानंतर विद्यार्थी लघुग्रहांची त्यांच्या नावावर नोंदणी करू शकतील.'
