कधी कधी एखादं स्वप्न उंच आकाशात उडायला लागतं, तेव्हा त्याला पंख लागत नाहीत… तर विश्वास लागतो. शहरांपासून दूर, साध्या आयुष्यात रमलेल्या काही लहान डोळ्यांनी जेव्हा पहिल्यांदा ढगांच्या पलीकडचं जग पाहिलं, तेव्हा केवळ अंतर पार झालं नाही, तर शक्यतांचं दार उघडलं. शिक्षण म्हणजे पुस्तकांपुरतं मर्यादित नसतं, तर आयुष्याला नवी दिशा देणारा अनुभव असतो, हे एका माणसाच्या कृतीने पुन्हा एकदा सिद्ध झालं.
advertisement
कर्नाटकातील कोप्पळ जिल्ह्यातील बहादूरबंडी या छोट्याशा गावातील एका सरकारी शाळेत अशी एक घटना घडली ज्याने अनेकांच्या डोळ्यात आनंद आश्रू आले.
26 डिसेंबर रोजी या शाळेचे मुख्याध्यापक बिरप्पा अंडागी यांनी आपल्या खिशातून तब्बल 5 लाख रुपये खर्च करून शाळेतील 24 विद्यार्थ्यांना आयुष्यातील पहिल्यांदाच विमानप्रवास घडवून आणला. वर्ग पाचवी ते आठवीतील ही मुलं ज्यांनी कधी विमानतळ पाहिलं नव्हतं, विमानात बसणं तर दूरच त्या दिवशी थेट आकाशात झेपावली.
तोरनगल्लू (जिंदाल विमानतळ) येथून बेंगळुरूकडे जाणाऱ्या विमानात चढताना मुलांच्या हातात बोर्डिंग पास होते, हात थरथरत होते आणि डोळ्यांत उत्सुकतेचं कुतूहल ओसंडून वाहत होतं. विमान धावपट्टीवरून उडताच केबिनमध्ये हशा, आश्चर्य आणि आनंद भरून राहिला आणि नकळत स्वप्नांनीही उंच भरारी घेतली.
विमानतळावर उभे असलेले पालक आणि गावकरी हा क्षण डोळ्यांत साठवत होते. अनेकांच्या डोळ्यांत पाणी होतं. त्यांच्या मुलांनी अनुभवलेला हा प्रवास, तोही त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच, त्यांच्यासाठीही कल्पनेपलीकडचा होता.
आपण हे सगळं का केलं, असं विचारलं असता बिरप्पा अंडागी यांनी अतिशय साध्या शब्दांत उत्तर दिलं. “या मुलांच्या डोळ्यांतला आनंद पाहणं, हेच माझं सर्वात मोठं बक्षीस आहे. यांच्यात उद्याचे शास्त्रज्ञ, अधिकारी, वैमानिक, नेते असू शकतात. आकाश आपल्यासाठीच आहे, यावर त्यांनी विश्वास ठेवावा, एवढंच मला वाटतं,” असं ते म्हणाले.
या प्रवासात केवळ विद्यार्थीच नव्हते, तर शाळेतील शिक्षक, मध्यान्ह भोजन योजनेतील स्वयंपाकी आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्यही सहभागी झाले. एकूण 40 जणांचा हा प्रवास एका शिक्षकाच्या ठाम विश्वासावर उभा होता, की शिक्षण म्हणजे केवळ अभ्यासक्रम नाही, तर शक्यतांची दारं उघडणं.
बहादूरबंडीतील ही शाळा आणि बिरप्पा अंडागी यांचा हा उपक्रम आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कारण कधी कधी एका छोट्या उड्डाणातूनच आयुष्याला नवी दिशा मिळू शकते आणि ते उड्डाण घडवण्यासाठी फक्त एक माणूस पुरेसा असतो.
