अमेरिकेला झटका, मोठी डील रद्द...
ट्रम्प यांनी केलेल्या टॅरीफ वाढीच्या घोषणेचा परिणाम दोन्ही देशांमधील व्यापारावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता, एका वृत्तानुसार, भारताने अमेरिकेचे पाचव्या पिढीचे एफ-35 लढाऊ विमान खरेदी करण्यास नकार दिला आहे. केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करत म्हटले की, संयुक्त उपक्रम म्हणून पाचव्या पिढीचे लढाऊ विमान विकसित करू इच्छितात. भारताचा जवळचा मित्र रशियाने देखील पाचव्या पिढीचे एसयू-57 लढाऊ विमान देण्याची ऑफर दिली आहे. काही वृत्तांनुसार, रशियाने तंत्रज्ञान हस्तांतरण आणि संयुक्तपणे पाचव्या पिढीचे विमान विकसित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. एफ-35 लढाऊ विमानांबाबत भारताच्या भूमिकेनंतर रशियाचे एसयू-57 पाचव्या पिढीचे लढाऊ विमानासाठी करार होण्याची शक्यता आहे.
advertisement
ट्रम्प यांनी दिली होती PM मोदींना ऑफर...
'ब्लूमबर्ग'च्या वृत्तानुसार, भारताला अमेरिकन एफ-35 लढाऊ विमान खरेदी करण्यात रस नाही. या वृत्तात अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की भारताने एफ-35 स्टेल्थ लढाऊ विमान खरेदी करण्यात रस नसल्याचे अमेरिकेला सांगितले आहे. फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही महागडी लढाऊ विमाने भारताला विकण्याची ऑफर दिली होती. तथापि, अधिकाऱ्यांनी सांगितले की मोदी सरकारला देशांतर्गत पातळीवर संरक्षण उपकरणांच्या संयुक्त डिझाइन आणि निर्मितीवर केंद्रित भागीदारीत अधिक रस आहे. याचा सरळ अर्थ असा की भारत संयुक्त आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या आधारावर संरक्षण करार करू इच्छित आहे. तांत्रिक समस्यांमुळे ब्रिटनच्या रॉयल नेव्हीचे F-35 लढाऊ विमान सुमारे 37 दिवस केरळमध्ये अडकले होते. याशिवाय, कॅलिफोर्नियामध्ये एक F-35 जेट देखील कोसळले आहे. या दोन्ही घटनांमुळे F-35 च्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
ट्रम्पच्या टॅरीफला भारत कसं देणार प्रत्युत्तर?
वृत्तानुसार, भारत अमेरिकेतून आयात वाढवून परिस्थिती संतुलित करण्याचा प्रयत्न करू शकतो. विशेषतः, नैसर्गिक वायू, दळणवळण उपकरणे आणि सोन्याची आयात वाढवण्याचा विचार केला जात आहे. या निर्णयामुळे येत्या 3 ते 4 वर्षात भारताचा अमेरिकेसोबतचं व्यापार अधिशेष कमी होऊ शकतो.
भारताने स्पष्ट केले आहे की ते अमेरिकन संरक्षण उपकरणांची अतिरिक्त खरेदी करणार नाही. यामध्ये ट्रम्प यांनी फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वॉशिंग्टन भेटीदरम्यान सादर केलेला F-35 स्टेल्थ फायटर जेटचा प्रस्ताव देखील समाविष्ट आहे. भारताने हा प्रस्ताव नाकारला आहे आणि देशांतर्गत संरक्षण उत्पादनावर भर देण्याच्या आपल्या धोरणाचा पुनरुच्चार केला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की अमेरिकेच्या दबावाला न जुमानता, भारत महागड्या आयातींना नाही तर संयुक्त संरक्षण उत्पादन आणि तांत्रिक भागीदारीला प्राधान्य देत आहे.