अरुणाचल प्रदेशमधील पापुम (Papum) आणि पारे (Pare) या दोन नद्यांच्या आसपासच्या टेकड्यांमध्ये दुर्मिळ खनिजांचा मोठा साठा आढळला आहे. याच नद्यांच्या नावावरून जिल्ह्याचे नाव पापुम पारे ठेवले आहे. इकोनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, जूनमध्ये खाण मंत्रालयाने एक पुस्तिका प्रसिद्ध केली. ज्यात या भागात नियोडिमियम (Neodymium) या महत्त्वाच्या खनिजाचा मोठा साठा असल्याचे म्हटले आहे. नियोडिमियम हे इलेक्ट्रिक वाहने आणि आधुनिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये वापरले जाते. दुर्मिळ खनिजांचा वापर मॅग्नेट बनवण्यासाठी होतो.
advertisement
देशाची स्थिती बदलेल
जर पापुम पारेमधील दुर्मिळ खनिजांचे उत्खनन सुरू झाले. तर यामुळे गुरुग्राम, पुणे आणि चेन्नई सारख्या शहरांमधील इलेक्ट्रिक वाहन (EV) आणि ऑटोमोबाइल उद्योगाला मोठी चालना मिळेल.
- आसाममधील कार्बी आंगलोंग येथेही दुर्मिळ खनिजांनी युक्त माती सापडली आहे.
- मेघालयच्या सुंग खोऱ्यात बॉक्साइट-दुर्मिळ खनिज पट्टा आढळला आहे.
कोळसा आणि खाण मंत्री किशन रेड्डी यांनी गेल्या महिन्यात संसदेत सांगितले की- मध्य प्रदेशातील सिंगरौली कोळसा क्षेत्रातही दुर्मिळ खनिजांचे आशादायक साठे सापडले आहेत.
या शोधांमुळे हे स्पष्ट होते की, ही मौल्यवान खनिजे फक्त समुद्रकिनाऱ्यांवरील वाळू किंवा आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांच्या गाळाच्या मातीपर्यंतच मर्यादित नाहीत, तर ती भारताच्या अंतर्गत भागांमध्ये, जंगल, पर्वत आणि कोळसा क्षेत्रांमध्येही आहेत.
चीनवरील मोठी निर्भरता
दुर्मिळ खनिजांच्या पुरवठ्यावर चीनने भारतासाठी काही निर्बंध लावले होते. ज्यामुळे इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांना मोठ्या अडचणी येत होत्या. याच कारणामुळे भारताने नवीन ठिकाणांचा शोध सुरू केला. भारत दुर्मिळ खनिजांपासून बनवलेल्या मॅग्नेटसाठी चीनवर मोठ्या प्रमाणावर (जवळपास ८५ ते ९०%) अवलंबून आहे.
कुठे येत आहे अडथळा?
दुर्मिळ खनिजांच्या साठ्याच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या दोन क्रमांकांवर चीन आणि ब्राझील आहेत. मात्र उत्पादन आणि शुद्धीकरणाचा विचार केल्यास आकडेवारी वेगळीच स्थिती दर्शवते.
अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षणच्या आकडेवारीनुसार, 2024 पर्यंत चीन जगातील सुमारे 70% दुर्मिळ खनिजांचे उत्खनन करतो आणि 90% शुद्धीकरण क्षमतेवर त्याचे नियंत्रण आहे. भारताचा उत्पादन हिस्सा 1% पेक्षाही कमी आहे. त्यामुळे भारताला अजून या खनिजांच्या उत्पादन आणि शुद्धीकरणामध्ये खूप काम करावे लागणार आहे.